नक्षलवाद नष्ट केल्याविना अशा घटना कायमस्वरूपी संपणार नाहीत. त्या दृष्टीने शासनाने ठोस कृती करायला हवी !
गोंदिया – जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भाग असलेल्या सालेकसा तालुक्यातील गेंडुरझरिया परिसरातून पोलिसांनी २६ डिसेंबर या दिवशी मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त केला. घातपात करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी ही स्फोटके या परिसरात लपवून ठेवली होती. गेंडुरझरिया परिसरात नक्षलवाद्यांनी स्फोटकांचा साठा लपवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या भागात शोधमोहीम राबवली. या शोधमोहिमेमध्ये पोलिसांना गेंडुरझरीया पहाडावरील अरण्यात २० किलो वजनाचा डबा, १५० जिलेटिनच्या कांड्या आणि २७ डिटोनेटर आढळून आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी अज्ञात नक्षलवाद्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.