श्रीराममंदिर १ सहस्र नव्हे, ३०० ते ४०० वर्षे टिकले तरी पुरे आहे !  – चंपत राय, सरचिटणीस, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट  

मंदिराचे आयुष्य वाढवण्यासाठी विविध प्रक्रिया करण्याचे विचाराधीन असल्याचीही माहीती !

यावरून प्राचीन वास्तूशिल्पे आणि मंदिरे, जी सहस्रो वर्षांपासून उभी आहेत, त्यांचे बांधकाम किती श्रेष्ठ होते, हे आपल्या लक्षात येते !  

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय (चित्र सौजन्य : पत्रिका)

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणारे श्रीराममंदिर १ सहस्र वर्षे टिकणार असल्याची कल्पना केवळ कल्पनाच आहे. हे मंदिर ३०० ते ४०० वर्षे टिकले, तरी आम्हाला ते पुरे आहे, असे प्रतिपादन श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी येथे केले. ते संतांना या मंदिराच्या प्रगतीविषयी माहिती देत होते.

१. चंपत राय यांनी सांगितले की, मंदिर उभारण्यासाठी करण्यात येणारी प्राथमिक चाचणी अयशस्वी ठरली आहे. काँक्रीटचे खांब ७०० टन वजन पेलू शकले नाहीत आणि ते खचले. मंदिराचे आयुष्य वाढवण्यासाठी सीमेंटमध्ये अभ्रक, कोळसा आणि अन्य काही रसायन टाकण्यावर विचार चालू आहे.

२. या मंदिराच्या उभारणीसाठी लार्सन अँड टुब्रो आणि टाटा कन्सल्टन्सी यांना दायित्व देण्यात आले आहे; मात्र मंदिर १ सहस्र वर्षे उभे राहील अशी शाश्‍वती देण्यास ते सिद्ध नसल्याचे म्हटले जात आहे.