हा चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणार्या प्रेमप्रकरणांचा परिणाम आहे ! चित्रपटात दाखवतात ते सर्व काल्पनिक म्हणजे खोटे असते. वास्तवात तसे वागल्यास कारागृहात जावे लागते, हे युवकांनी लक्षात घेऊन चित्रपट अभिनेत्यांचा आदर्श ठेवणे आतातरी बंद करावे !
कणकवली – तालुक्यातील एका गावात शाळेत जाणार्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी ऋतिक कमलाकर कदम (वय २० वर्षे) या युवकाला न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी बजावली.
पीडित मुलगी १६ डिसेंबरला दुपारी १ वाजता शाळेतून घरी निघाली होती. त्या वेळी परिसरातील एका युवकाने दुचाकीवरून येत तिला प्रेम करण्याविषयी विचारणा केली. त्याला प्रतिसाद न देता ती मुलगी तशीच पुढे गेली. त्या वेळी पाठलाग करून त्या युवकाने तिचा हात पकडला आणि मनात लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. ही गोष्ट मुलीने घरी जाऊन सांगितल्यावर तिच्या वडिलांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी कदम याच्या विरोधात विनयभंग आणि ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.