आश्रमातील फलकाद्वारे साधकांना देण्यात आली आनंदवार्ता !
रामनाथी (फोंडा, गोवा) – येथील सनातनच्या आश्रमात ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या वितरणाची सेवा करणारे श्री. धनंजय राजहंस (वय ७० वर्षे) हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जीवनमुक्त झाले. साधकांना ही आनंदवार्ता आश्रमातील फलकाद्वारे देण्यात आली. या आनंददायी वार्तेनंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री. धनंजय राजहंस आणि त्यांचे कुटुंबीय यांची भेट घेतली. विशेष म्हणजे श्री. धनंजय राजहंस यांचा १७ डिसेंबर २०२० या दिवशी तिथीनुसार वाढदिवस ! त्यामुळे ‘श्रीगुरूंनी वाढदिवसाच्या दिवशी आनंददायी आणि भावमय भेट दिली’, असा श्री. राजहंसकाका यांचा भाव होता. श्री. राजहंस यांना ही वार्ता कळल्यावर त्यांना भावाश्रू अनावर झाले.
या वेळी श्री. राजहंस यांच्या पत्नी सौ. वैशाली राजहंस, सनातनचे संत आणि श्री. राजहंस यांचे जावई पू. संदीप आळशी, त्यांच्या पत्नी आणि श्री. राजहंस यांची मुलगी सौ. अवनी आळशी; श्री. राजहंस यांची दुसरी मुलगी सौ. नंदिनी चितळे, त्यांचे पती श्री. नीलेश चितळे; श्री. राजहंस यांचा मुलगा आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, त्यांच्या पत्नी सौ. प्रियांका राजहंस, श्री. राजहंस यांचे व्याही डॉ. अजय जोशी आदी उपस्थित होते. या वेळी श्री. राजहंस यांच्यासमवेत सेवा करणार्या सौ. मीनाक्षी धुमाळ ‘ऑनलाईन’ जोडल्या होत्या. राजहंस कुटुंबीय आणि नातेवाइक यांना वरील आनंदवार्ता कळल्यावर उपस्थितांनी श्री. धनंजय राजहंस यांच्याविषयीची गुणवैशिष्ट्ये सांगितली.
श्री. धनंजय राजहंस यांचे मनोगत – देवाच्याच कृपेने प्रगती झाली !
‘मी जीवनमुक्त होईन’, अशी अपेक्षा केली नव्हती. ‘माझी लवकर प्रगती होणार नाही’, असा माझ्या मनात नकारात्मक संस्कार होता. मी पुष्कळ ठिकाणी न्यून पडतो. त्यामुळे कदाचित् ‘मी ६१ टक्के पातळी गाठू शकेन’, असे वाटत नव्हते. देवाच्याच कृपेने माझी प्रगती झाली. या आनंदवार्तेमुळे माझा आत्मविश्वास वाढून उभारी आली आणि आनंद वाढला. खरे तर ‘मी काही केले’, असे जाणवत नाही; कारण अंतःप्रेरणा देणारे तेच (गुरु) आहेत आणि जे काही थोडेसे प्रयत्न केले, ते देवानेच चिकाटीने करवून घेतले. मी साधनेत सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करतो; पण कधी खंड पडतो. असे असले तरी देव पुन्हा उभारी देतो आणि मी प्रयत्न करतो. देवच प्रयत्नांची प्रेरणा देतो आणि तोच शक्ती देतो.
यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ श्री. राजहंसकाकांना म्हणाल्या, ‘‘हाच कृतज्ञताभाव सतत राहू दे. गुरुच पुढे प्रयत्न करून घेतील.’’
पू. संदीप आळशी यांनी केलेले मार्गदर्शन
साधना करतांना संयमशीलता हवी !
‘अनेक वर्षे साधनेचे प्रयत्न करतो आहे; पण आध्यात्मिक प्रगती होत नाही’, असा विचार साधकांनी करायला नको. संयमशीलता हा फार मोठा गुण आहे. ‘गुरु आपली प्रगती करवून घेणारच आहेत’, ही श्रद्धा ठेवली, तर संयम वाढतो. त्यामुळे साधनेतील प्रयत्नांचा आनंद घेता येतो. हे सर्वांत महत्त्वाचे आहे.
साधना समजल्यावर त्वरित मायेचा त्याग करणारे आणि मुलांनाही मायेत गुंतू न देता त्यांच्यावर पूर्णवेळ साधना करण्याचे संस्कार करणारे श्री. धनंजय राजहंस !
‘मी साधनेच्या प्रसारासाठी नागपूरला जायचो, तेव्हा श्री. धनंजय राजहंस यांच्या घरी रहायचो. तेव्हा ते आणि त्यांचे कुटुंबीय माझ्याशी इतके घरच्याप्रमाणे वागायचे की, मला वाटायचे, ‘मी घरीच आलो आहे.’ पुढे एकेक करून त्यांची तिन्ही मुले पूर्णवेळ साधक म्हणून सनातनच्या आश्रमांत रहायला आली. ती सर्व इतकी गुणवान होती की, त्यांच्या वडिलांशिवाय इतर कुणालाही अशी गुणवान मुले तयार करणे अशक्य झाले असते. त्यांचा मुलगा श्री. चेतन यानेही ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. साधना करून साधनेत प्रगती करणे एकवेळ सोपे आहे; पण आपल्या तिन्ही मुलांकडून पूर्णवेळ साधना करून घेणे महाक्लिष्ट आहे. ते श्री. आणि सौ. राजहंस यांनी करून दाखवले आहे. त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या तिन्ही मुलांचे कौतुक करावे, तेवढे थोडे ! त्यांच्या पत्नीनेही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. श्री. धनंजय राजहंस यांच्या पूर्ण साहाय्यामुळे त्यांना हे शक्य झाले आहे. हल्लीच्या काळात बहुतेक पती पत्नीच्या साधनेला विरोध करतात. श्री. धनंजय राजहंस यांनी विरोध न करता पूर्ण साहाय्य केल्यामुळे मुलांच्या प्रगतीत दोघांचाही मोलाचा सहभाग आहे. त्याबद्दल त्या दोघांचे अभिनंदन ! अशा आदर्श आणि अद्वितीय कुटुंबाचे सर्व साधकांनी अनुकरण केल्यास सर्वत्र साधक कुटुंबीय निर्माण होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना जलद गतीने होईल ! असे करणार्या श्री. धनंजय राजहंस यांनी आज ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. हे पाहून मला खूप आनंद होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन
१. ‘मी साधनेत न्यून पडतो’, हा विचार सातत्याने ठेवून त्याला प्रयत्नांची जोड द्यावी !
‘मी साधनेत न्यून पडतो’, हा विचार सातत्याने असायला हवा; म्हणजे खरी प्रगती होते. ती जाणीव अंतरात सतत असायला हवी. या विचारामध्ये नकारात्मकता न ठेवता त्याला साधनेच्या कृतीच्या स्तरावरील प्रयत्नांची जोड द्यायला हवी, तसेच देवाला साधनेचे प्रयत्न सुचवण्यासाठी सतत सांगायला हवे.
२. गुरुदेवांनी एका एका साधकाला निवडले आहे आणि ते साधक त्यांची प्रगती करून घेऊन जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होत आहेत. या सर्वांतून ईश्वराचे नियोजन शिकायला मिळते.
३. साधनेतील कृतींचे प्रयत्न तळमळीने केल्यास पालट होतो !
श्री. राजहंसकाकांना भ्रमणभाषवर बातम्या वाचण्याची सवय होती; पण तसे न करण्याविषयी आणि त्याचे तोटे लक्षात आणून दिल्यावर त्यांनी लगेचच ती सवय बंद केली. यामुळे त्यांचा वेळ वाचला. यातून एखादी कृती मनाने स्वीकारून पालट करणे कठीण असते; पण ती कृती लगेच करणे आवश्यक असते, हे शिकता येते. एखाद्या दोषावर तळमळीने प्रयत्न केल्यास पालट होतो आणि स्वीकारार्हता वाढते.
४. साधकांनी प्रयत्नांमधील आनंद घ्यायला हवा !
परात्पर गुरुदेव साधनेचे बळ आणि ऊर्जा देतात. जे काही घडते ते ईश्वरी नियोजनानुसार घडते. जीवनात जे घडते, त्यातून पुष्कळ शिकायचे. आपण तीव्र दोषांवर मात करून पालट कसा करायचा, ते शिकून प्रयत्नांमधील आनंद घ्यायला हवा. तो घेतला की, आपली प्रगती होत जाते आणि देव साधकांच्या प्रगतीसाठी आसुसलेला आहे. आपण तळमळीने धडपड केली की, देव पुढे नेतो. साधकांनी चिकाटीने आणि संयमाने प्रयत्न केल्यास काही कालावधीत पालट होऊ शकतो. प्रत्येक साधकात वेगवेगळ्या गुणांचे पैलू असून ते शिकून प्रयत्न करूया, तसेच ‘आपण कुठे न्यून पडतो’, ते बघून त्यावर मात करायला हवी.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री. धनंजय राजहंस यांच्या वाढदिवसानिमित्त वाचून दाखवलेले काव्य
काका, खरेच झालात तुम्ही धनंजय !!
नाव तुमचे आहे धनंजय
म्हणोनी धनाचा करूनी त्याग ।
लोभ-मोहावर मिळवलात विजय
खरेच झालात तुम्ही धनंजय ॥
असे नाव धनंजय अर्जुनाचे
लढला जैसा अर्जुन दुर्जन कौरवांशी ।
कृपाशीर्वाद अपार गुरुमाऊलीचे
लढण्या दोष-अहंरूपी शत्रूंशी ॥
अर्जुनासम कृष्णसखा राहे, तुमच्यासवे सदोदित,
चतुर श्रीकृष्णाने दिली तुम्हा सेवा ग्रंथ वितरणाची ।
हिशोब केला त्याने स्वत: तुमच्या प्रयत्नांचा
तो सर्वांसमक्ष मांडतो आज, लेखा तुमच्या साधनेचा ॥
आज तुम्ही वयाचा ७० (*) हा आकडा गाठला
आकड्यातील भगवंत तुम्हा भेटला ।
भगवंताने गोड गुपित उलगडले आकड्यांतूनी
‘६१’ या आकड्याच्या रूपाने संकेत देऊनी
मुक्त केले राजहंसकाकांसी जन्म-मृत्यूच्या बंधनातूनी ॥
गुरुकृपेने जन्म-मृत्यूवर मिळवून विजय
काका, खरेच झालात तुम्ही धनंजय !!
(*) वयाच्या ७० व्या वर्षात पदार्पण केले.
श्री. धनंजय राजहंसकाका यांचे आध्यात्मिक कुटुंब !
डॉ. अजय जोशी (व्याही) यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
श्री. धनंजय राजहंसकाका यांचे जीवन शिस्तबद्ध आहे. ते नामजपादी उपायांमध्ये कधीही सवलत (सूट) घेत नाहीत. त्यांच्यातील चिकाटीमुळेच ते जीवनमुक्त झाले आहेत.
सौ. मीनाक्षी धुमाळ यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
श्री. राजहंसकाकांच्या सेवेत अचूकता आणि परिपूर्णता असते. ते कधीही नामजपादी उपाय पूर्ण केल्याखेरीज सेवेला प्रारंभ करत नाहीत. पूर्वी साधकांशी बोलतांना त्यांची चिडचिड व्हायची किंवा त्यांना प्रतिक्रिया यायची. आता ते शांतपणे आणि स्थिर होऊन बोलतात. त्यांची विचारण्याची वृत्ती वाढली असून ते कोणतीही सेवा विचारून विचारूनच करतात.
श्री. धनंजय राजहंसकाका यांना वाढदिवसानिमित्त, तसेच जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त
झाल्याविषयी सनातन परिवाराकडून कोटी कोटी नमस्कार !
श्री. धनंजय राजहंस यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत. |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक