प्रसिद्धीलोलूप तृप्ती देसाई यांच्यावर कडक कारवाई करा ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वत:हून अशी कारवाई का करत नाही ?

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ११ डिसेंबर (वार्ता.) – श्री साई संस्थानने मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी दर्शनासाठी येणार्‍या भक्तांना वस्त्रसंहिता निश्‍चित केली असून त्याचा फलकही लावण्यात आला आहे. संस्थानच्या या निर्णयाचे समस्त वारकरी संप्रदायाने स्वागत केले आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी फलक काढण्यास गेलेल्या तृप्ती देसाईंना अटक करण्यात आली असली, तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,

१. तृप्ती देसाई यांचे वागणे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. कोणतीही पूजा ही शास्त्रानुसार सोवळे नेसून करण्याची पद्धत आहे. त्यातून देवतांचे तत्त्व अधिक प्रमाणात मिळून वातावरण पवित्र रहाते. सोवळे नेसून पूजा-अर्चा करणार्‍यांना तृप्ती देसाई अर्धनग्न संबोधतात; मात्र हिंदु संस्कृती विसरलेले भाविक तोकड्या कपड्यांमध्ये दर्शनाला येतात म्हणून फलक लावल्याने त्या अस्वस्थ होतात. त्यांची ही वृत्ती आणि दृष्टी हीनतेची वाटते.

२. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून शासनाने हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याने दर्शनार्थी तोकड्या कपड्यांमध्ये दर्शनाला जात आहेत. त्यांचे समर्थन करण्यासाठी तृप्ती देसाई पुढे येतात आणि त्यांना अनेक प्रसिद्धीमाध्यमे प्रसिद्धीही देतात. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी महाराष्ट्र शासनाने तृप्ती देसाई यांच्यावर कडक कारवाई करावी.