वरवरा राव यांच्या जामिनाच्या याचिकेवर १४ डिसेंबर या दिवशी सुनावणी

वरवरा राव

मुंबई – शहरी नक्षलवादाच्या प्रकरणी अटकेत असलेले लेखक वरवरा राव यांनी आरोग्याच्या कारणास्तव जामिनाच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर १४ डिसेंबरला या दिवशी सविस्तर सुनावणी घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असली, तरी १४ डिसेंबरपर्यंत त्यांना नानावटी रुग्णालयातच ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. राव यांच्या जामिनाची मागणी करणार्‍या, तसेच त्यांना नानावटी रुग्णालयात हलवण्याच्या त्यांची पत्नी हेमलता यांनी केलेल्या याचिकेवर ३ डिसेंबर या दिवशी सुनावणी झाली. त्या वेळी राव यांच्या प्रकृतीचा अहवाल रुग्णालयाच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आला. राव हे ८१ वर्षांचे असून त्यांना मेंदूशी संबंधित विकार आहेत. कोरोनानंतर त्यांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अशा स्थितीत कारागृहातील रुग्णालयातच उपचार करण्याची भूमिका सरकार घेऊ शकत नाही, असे नमूद करत राव यांना न्यायालयाने नानावटी रुग्णालयात भरती करण्याचे आदेश दिले होते.