भाग्यनगर (तेलंगाणा) – जेव्हा आम्ही घुसखोरांच्या विरोधात कायदा आणतो, तेव्हा ओवैसी यांच्यासारखे लोक संसदेत गोंधळ घालायला लागतात. रोहिग्यांवर आम्ही जेव्हा कारवाई करतो, तेव्हा विरोधी पक्ष गोंधळ घालतात. ओवैसी यांनी एकदा आम्हाला लिहून द्यावे, ‘बांगलादेशी रोहिंग्यांना काढून टाका.’ मग मी ते करतो, असे प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांना दिले. ‘जर हैद्राबादमध्ये अवैधरित्या बांगलादेशी आणि रोहिंग्या रहात आहेत, तर अमित शहा कारवाई का करत नाही ?’, असा प्रश्न ओवैसी यांनी विचारला होता. त्याला शहा यांनी उत्तर दिले. ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अमित शहा यांनी सकाळी एक रोड शो केला. त्यापूर्वी त्यांनी येथील भाग्यलक्ष्मी मंदिरात पूजा आणि आरतीही केली.
शहा म्हणाले की, आम्ही हैद्राबादला नवाब, निजाम संस्कृतीतून मुक्त करणार आहोत आणि ‘मिनी इंडिया’ बनवणार आहोत. आम्हाला हैद्राबादला एक आधुनिक शहर बनवायचे आहे, जे शहर निजामाच्या संस्कृतीतून मुक्त असेल. या वेळी हैद्राबादचा महापौर हा आमच्याच पक्षाचा असेल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला.