पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पर्वरीवासियांचा सा.बां. खात्याच्या कार्यालयावर मोर्चा

पणजी, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – आमदार रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली शंभराहून अधिक पर्वरीवासियांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पर्वरी येथील कार्यालयावर मोर्चा नेला. पर्वरी परिसरात गेले काही मास पाण्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असल्याने हा मोर्चा नेण्यात आला. या समस्येवर तातडीने तोडगा न काढल्यास पुढील आठवड्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पर्वरी येथील कार्यालयाला कुलुप ठोकण्याची चेतावणी नागरिकांनी दिली आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते सार्वजनिक बांधकाम खाते स्थानिकांच्या समस्येविषयी संवेदनशील नाही. सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकार्‍यांनी टँकर माफियांशी हातमिळवणी केली आहे.