अफगाणिस्तानात १५० पाकिस्तानी आतंकवादी ठार

काबूल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये आतंकवादाच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत पाकपुरस्कृत १५० हून अधिक आतंकवादी ठार झाले आहेत. देशातील हेलमंद आणि कंदाहार येथे गेल्या एक मासापासून कारवाई चालू आहे. यात जवळपास ७० तालिबानी आतंकवाद्यांना ठार केल्याची माहिती अफगाणिस्तान सरकारने दिली आहे.

१. सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही जेव्हा मोहीम चालू केली, त्या वेळी  वेगवेगळ्या ठिकाणचे २० आतंकवादी कमांडर होते. सुमारे ४५ ते १०० आतंकवाद्यांचे ते नेतृत्व करत होते. कंदाहारमध्ये जवळपास ४० तालिबानी आतंकवादी कमांडर मारले गेले आहेत. आमची मोहीम अद्यापही चालू आहे. तालिबानच्या आक्रमणात मागच्या २५ दिवसांत सुमारे १२५ नागरिकांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. आतापर्यंत ३०० हून अधिक नागरिक घायाळ झाले होते.

२. दुसरीकडे ‘सामान्य नागरिकांवर कोणतीही आक्रमणे करण्यात आलेली नाहीत’, असे तालीबानने स्पष्ट केले.

३. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार पाकपुरस्कृत सुमारे ६ सहस्र ५०० आतंकवादी अफगाणिस्तानात सक्रीय आहेत. यातील बहुतांश आतंकवाद्यांचा संबंध ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या जिहादी आतंकवादी संघटनेशी असल्याचे नमूद करण्यात आले होते.