मुंबईत दिवाळीत गेल्या १७ वर्षांतील सर्वांत अल्प ध्वनीप्रदूषण

मुंबई – या वर्षीच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी मुंबईमध्ये सर्वांत अल्प ध्वनीप्रदूषण झाल्याची नोंद ‘आवाज’ फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. मुंबईमध्ये गेल्या १७ वर्षांतील सर्वांत अल्प ध्वनीप्रदूषण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे शक्य झाले आहे.

वर्ष २०१९ मध्ये मरिन ड्राईव्ह परिसरात सर्वाधिक म्हणजे ११२ डेसिबलची नोंद झाली होती. या वर्षी सर्वाधिक १०५.५ डेसिबलची नोंद शांतता क्षेत्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे करण्यात आली आहे. रात्री १० नंतर येथे फटाके वाजवण्यात आले. ‘अनेक ठिकाणी फटाके वाजतच नव्हते. त्यामुळेही नोंद घेणे कठीण होते’, असे आवाज फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी सांगितले.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी फटाकेबंदीचा निर्णय आणि त्याच्या जोडीला अल्प फटाके वाजवून प्रदूषण न्यून व्हावे, यासाठी केलेल्या प्रशासनाच्या आवाहनाला मुंबईकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मुंबईच्या वायूप्रदूषणाविषयी ‘सफर’ संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये मुंबईच्या हवेची गुणवत्ता सर्वसाधारण राहिली असून या वर्षी हवेच्या गुणवत्तेचा आलेख (एअर क्वालिटी इंडेक्स) हा २०० पेक्षा अल्प राहिला आहे. वर्ष २०१६-१८ पेक्षा यंदा फटाक्यांचे उत्सर्जन ५० टक्क्यांपेक्षा अल्प झाले आहे.

देहली, पुणे, अहमदाबाद या मोठ्या शहरांपेक्षा मुंबईतील वायूप्रदूषण हे दिवाळीच्या पहिल्या आणि दुसर्‍या दिवशी अल्प असल्याचे आकडेवारीमध्ये स्पष्ट झाले आहे. चेंबूर, माझगाव, मालाडमध्ये सर्वाधिक वायूप्रदूषणाची नोंद झाली.