‘सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना केल्यामुळे झालेले लाभ’ याविषयी देवद आश्रमातील श्री. अरुण डोंगरे यांची झालेली विचारप्रक्रिया !

‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यास होणार असलेले अपेक्षित लाभ आणि संभाव्य हानी अन् सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना केल्यामुळे झालेले लाभ’ यांविषयी देवद आश्रमातील श्री. अरुण डोंगरे यांची झालेली विचारप्रक्रिया !

‘आयआयटी (Indian Institute of Technology (IIT))’ कानपूरहून ‘बी.टेक्. (Bachelor of Technology)’ केल्यानंतर वर्ष १९७५ मध्ये मी ठरल्याप्रमाणे अमेरिकेत ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (Massachusetts Institute of Technology (MIT) जगातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ)) येथे ‘एम.एस्. (Master of Science)’ आणि ‘Sc.D. (Doctor of Science)’ करण्यासाठी गेलो असतो, तर होणारे लाभ, होणारी हानी आणि सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेकडे वळल्यामुळे झालेले लाभ पुढे दिले आहेत.

श्री. अरुण डोंगरे

१. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलो असतो, तर मला पुढील अपेक्षित लाभ झाले असते.

अ. ‘पुढचे शिक्षण मिळून बुद्धीचे सुख मोठ्या प्रमाणात मिळाले असते.

आ. पुढे अमेरिकेचे नागरिकत्व मिळून तेथेच आयुष्य गेले असते.

इ. माझ्या विषयात (‘मटेरियल सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग’मध्ये) खोलवर माहिती मिळाली असती.

ई. ‘एम्आयटी’मध्ये अनेक ‘नोबल’ परितोषिक विजेते शिकवण्याचे आणि संशोधनाचे कार्य करत असल्यामुळे त्यांच्याशी परिचय होऊन ‘धातूविज्ञान’ या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान केले असते.

उ. अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली असती.

ऊ. अमेरिकेत मोठ्या ‘स्टील कंपनी’त उच्च जीवनमान अनुभवले असते.

ए. शिक्षणानंतर भारतात परतलो असतो, तरी ठरल्याप्रमाणे ‘टाटा स्टील’ या आस्थापनात चांगली नोकरी मिळाली असती. त्या वेळी रुसी मोदी आणि जे.जे. ईरानी या दोघांनी (‘टाटा स्टील’ या आस्थापनातील सर्वांत उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी) याविषयी मला आधीच आश्‍वस्त केले होते.

ऐ. व्यावहारिक यशाविषयी माझा आत्मविश्‍वास वाढला असता.

. सतत यश मिळत गेल्याने मानसिक स्थैर्य लाभले असते.

२. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलो असतो, तर माझी पुढील हानी होऊ शकली असती.

अ. अमेरिकेतच आयुष्य गेले असते, तर भारताच्या सात्त्विकतेला मुकलो असतो.

आ. समाजातील उच्च वर्गाशीच जोडलो गेल्याने साधारण वर्गाशी संपर्क आला नसता. सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न समजले नसते आणि अहं पुष्कळ वाढला असता.

इ. शिक्षणामध्ये ‘डिप्लोमा’ आणि ‘बी.ई.’ करणार्‍यांनाही मी तुच्छ (कमी) लेखत होतो. त्यामुळे सध्या रुढ असलेल्या व्यावहारिक शिक्षणपद्धतीविषयी माझ्या मनात हीन भावना निर्माण झाली असती.

ई. सतत व्यावहारिक यश मिळत गेले असते, तर साधनेकडे वळण्याची शक्यता न्यून होती.

उ. बाह्य जग आणि वस्तू यांनाच सत्य मानले असते.

ऊ. साधनेच्या दृष्टीकोनांना अंधश्रद्धा मानले असते.

ए. ‘खरा आनंद आध्यात्मिक स्वरूपाचा असतो’, हे समजले नसते.

३. माझ्या काही अडचणींमुळे मला अमेरिकेला पुढील शिक्षणासाठी जाता आले नाही. त्यानंतर मी भारतात नोकरी केली आणि व्यवसायही केला.

४. वर्ष १९९८ मध्ये सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेकडे वळल्यामुळे मला झालेले लाभ

अ. मी नोकरी आणि व्यवसाय यांत पुष्कळ प्रयत्न आणि जीवापाड धडपड केली; पण मला अपेक्षित व्यावहारिक यश मिळाले नाही. त्या वेळी ‘हे काहीतरी बुद्धीच्या पलीकडचे आहे’, असे जाणवू लागले होते. त्यामुळे सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर नामजप, सत्संग, अभ्यासवर्ग आणि अध्यात्मप्रसार लगेच चालू करता आले.

आ. भौतिक आकर्षणे आणि व्यावहारिक आवश्यकता न्यून झाल्या. त्यामुळे पूर्णवेळ साधनेसाठी देता येऊ लागला.

इ. ‘भगवंताला जे करवून घ्यायचे आहे, ते तो करवून घेतो किंवा तसे करवून घेतले जात होते आणि पुढेही त्याला अपेक्षित असे करवूनच घेतले जाणार’, अशी श्रद्धा दृढ झाल्याने भविष्याची चिंता ९० टक्के न्यून झाली. त्यामुळे वर्तमानात रहाता येऊ लागले.

ई. ‘आवश्यकतेपेक्षा अधिक पैसे ठेवून काय करायचे ?’, असा विचार दृढ झाला आणि पैशांविषयी काही वाटेनासे झाले.

उ. ‘आयुष्यात आलेले सुख-दुःखाचे प्रसंग तीव्र असले, तरी तसे घडले; म्हणून अध्यात्माकडे वळायला साहाय्यच झाले’, याविषयी कृतज्ञता वाटू लागली. (‘भौतिक आणि व्यावहारिक अपयशामुळे मी साधनेकडे वळलो’, हा विचार आजही माझ्या मनात आहे.)

ऊ. पूर्वी दुसर्‍यांकडून मनस्ताप झाल्याने मला त्यांचा राग यायचा. आता ‘आपल्याप्रमाणेच इतरांकडूनही कृती करवून घेणारा भगवंतच आहे’, हा विचार दृढ असल्याने त्यांच्याप्रती मनात असलेला राग आणि प्रतिक्रिया न्यून झाल्या.

ए. ईमेल, ट्विटर आणि फेसबूक यांसारख्या ‘सोशल मिडिया’चा उपयोग जास्तीतजास्त अध्यात्मप्रसारासाठी करता येऊ लागला.

ऐ. साधनेत आल्यानंतर मला माझ्या शिक्षणाशी संबंधित विषयीचे (Foundry Technology चे) शोधनिबंध लिहिता आले.

ओ. पूर्वी व्यावहारिक अपयशामुळे निर्माण झालेली नकारात्मकता साधनेमुळे न्यून होऊ लागली.

औ. ‘सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून आध्यात्मिक प्रगती करता येईल आणि पुढे मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने वाटचाल करता येईल’, ही श्रद्धा दृढ होऊन माझ्याकडून कृती होऊ लागली.

वरीलप्रमाणे झालेल्या विचारप्रक्रियेसाठी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अरुण डोंगरे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.४.२०२०)