(म्हणे) ‘…मग राममंदिराचे भूमीपूजनही प्रतिकात्मक करा !’ – खासदार इम्तियाज जलील, एम्.आय.एम्.

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने शासनाने धार्मिक उत्सव, सण साजरे करण्यास प्रतिबंध केला आहे. सर्व शासकीय नियम पाळून राममंदिराचे भूमीपूजन केले जाणार असल्याने एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील या कार्यात खोडा घालण्याचा प्रयत्न का करत आहेत ? असे वक्तव्य केल्याविषयी पोलिसांनी जलील यांना नोटीस पाठवून समज द्यावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे.

इम्तियाज जलील

संभाजीनगर – राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व सण उत्सव साजरे करण्यावर शासनाने निर्बंध आणले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर राज्यशासनाने मुसलमानांना बकरी ईद प्रतिकात्मकरित्या साजरी करण्याचे आवाहन केले आहे; मात्र याला एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे.

शासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेतांना ते म्हणाले की, ‘बकरी ईदच का प्रतिकात्मक साजरी करायची ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अयोध्येतील राममंदिराचे प्रतिकात्मक भूमीपूजन करावे.’ (बकरी ईद सर्वत्र साजरी केली जात असल्याने त्यावर शासनाने निर्बंध घातले आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठराविक वेळेसाठी अयोध्येतील राममंदिराच्या भूमीपूजनाला जाणार आहेत. संपूर्ण देशात राममंदिराचे भूमीपूजन करण्यात येणार नाही, हे जाहीर असतांना खासदार इम्तियाज जलील सवंग लोकप्रियतेसाठी आणि मुसलमानांना चिथावण्यासाठी अशी विधाने करत आहेत का ?, याची चौकशी होणे अपेक्षित आहे ! – संपादक)