…तर शेतकर्‍यांसाठी सुगीचे दिवस येतील !

नोंद 

सध्या देशात दळणवळण बंदी लागू असली, तरी खरीप हंगाम हातातून जाऊ नये, यासाठी कृषी क्षेत्राला त्यातून वगळण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी शेती अवजारे, त्यांची देखभाल-दुरुस्ती, कीटकनाशके, बी-बियाणे, खते आदींचे चढे दर या सर्वांनी शेतकरी हैराण झाला आहे. प्रत्येक खरीप हंगामामध्ये शेतकर्‍यांना मागणीप्रमाणे खते, बियाणे, कीटकनाशके बांधावर उपलब्ध करून देण्याविषयी लोकप्रतिनिधी आश्‍वासन देत असतात. याविषयी अजून तरी कृषी विभागाचे कोणतेही नियोजन दिसत नाही. दळणवळण बंदीचे कारण असले, तरी कृषी विभागासाठी खरीप हंगाम थांबणार आहे का ?, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना सतावू लागला आहे. प्रतिवर्षी कृषी निविदांमध्ये होणारा सावळा गोंधळ सर्वश्रृतच आहे. तसेच ठिकठिकाणी शेतकर्‍यांची अडवणूक करून ज्यादा दराने खते, बियाणे विकणे, विशिष्ट शेतीमाल घेण्यासाठी विक्रेत्यांकडून बळजोरी केली जाणे आदी प्रकार घडत असतात. अशा खते आणि बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभागाने योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी निविदांमध्ये घोटाळा करणार्‍या व्यापार्‍यांना पकडण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असले, तरी त्यांना कायमची अद्दल घडवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.

खरीप हंगामापूर्वी राज्यातील पाणीपुरवठा, वीजपुरवठा आदी गोेष्टींकडेही सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक ग्रामीण भागात आतापासूनच पाण्याचे दुर्भीक्ष जाणवू लागले आहे. शेतीसाठी तर सोडाच पिण्याच्या पाण्यासाठीही शेतकरी बांधवांना आतापासूनच पायपीट करावी लागत आहे. शेतीसाठी धरणातील पाण्याची आवर्तने सोडण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत. बहुतांश ग्रामीण भागांत विजेची ओरड असून दुरुस्तीअभावी ट्रान्सफॉर्मर पडून आहेत. अनेक वेळा मागणी करूनही शेतकर्‍यांना वीजजोडण्या दिल्या जात नाहीत. रात्री-अपरात्री शेतकर्‍यांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते.

सध्या राज्यातील लक्षावधी हेक्टर क्षेत्रामध्ये खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये भात, बाजरी, मका, नाचणी, सोयाबीन आदी क्षेत्रांचा समावेश आहे. यासाठी सहस्रो क्विंटल खतांची आवश्यकता आहे. पिकांची गुणवत्ता, उगवणक्षमता आदी गोष्टी खतांवरच अवलंबून असतात. प्रत्येक शेतकर्‍याकडे बियाणे आणि थोडेसे खत उपलब्ध असतेच. दळणवळण बंदीच्या या कठीण काळात धान्योत्पादनावरचा व्यय न्यून करण्यासाठी शेतकरी बांधव स्वत:कडील बियाणे आणि खतांचा वापर करू शकतात. शेतकर्‍यांच्या कष्टाचे फळ त्यांना द्यायचे असेल, तर सरकारनेही शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधील ‘दलाल व्यवस्था’ संपुष्टात आणणे महत्त्वाचे आहे. शेतकरी ते ग्राहक अशी बाजारपेठ शेतकर्‍यांना उपलब्ध झाल्यास शेतकरी बांधवांसाठी दळणवळण बंदीतही सुगीचे दिवस येतील, हे नक्की !

– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा