
मुंबई, २७ मार्च (वार्ता.) – मुंबईच्या रस्त्यांवरून काही जण प्रश्न विचारत आहेत; पण इतकी वर्षे डांबराचे सांबार कुणी खाल्ले ? हे त्यांनी स्पष्ट करावे. आरशात पाहून वारसा सांगता येत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर केली. विधान परिषदेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते उत्तर देत होते.
मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘कार्यकर्त्यांनो पेटवा मशाल, आम्ही झोपतो खुशाल’ अशी यांची अवस्था आहे. ते कार्यकर्त्यांना कचरा समजतात. त्यामुळेच त्यांना आम्ही ‘हायव्होल्टेज शॉक’ दिला. सध्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण चालू आहे. त्यामुळे लोकांना थोडा त्रास होत आहे; परंतु त्यानंतर पुढील २५ वर्षे मुंबईत खड्डे दिसणार नाहीत. डांबरात हात काळे करण्याची संधी त्यांना मिळणार नाही. पोपटाचा जीव पिंजर्यात असतो, तसा यांचा जीव मुंबईतील रस्त्यांत आहे. मागच्या अनेक वर्षात डांबराचे सांबर कुणी खाल्ले, हे आता समोर यायला हवे.
ते म्हणाले की, महाराष्ट्राला देशात एक नंबर करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. राज्यात पायाभूत सुविधांची १० लाख कोटी रुपयांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. नवी मुंबई विमानतळ, वाढवण बंदर विकासाचे काम चालू आहे. ‘कनेक्टिव्हिटी’वर आम्ही भर दिला आहे. उद्योजक, व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. पर्यटन विकासासाठी प्रयत्न करत आहोत. मे मासात मोठा पर्यटन महोत्सव महाबळेश्वरमध्ये घेतला जाणार आहे.
आरशात पाहून वारसा सांगता येणार नाही
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना देवेंद्र फडणवीस औरंगजेबासारखे वाटले. त्यांना सांगायला हवे की, सगळीच वेळ सारखी नसते. मशाल पेटवून खुशाल झोपा काढणार्यांना आता शहापण आले असेल. ‘गद्दार, गद्दार’ म्हणून टीका करत बसलात. खोटे खटले उभे करून देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना अटक करण्याचा प्रयत्न करतांना कुठे होते संविधान ? भाजपचे नेते नारायण राणे यांना अटक करतांना, राणा दाम्पत्याला त्रास देताना संविधान आठवले नाही ? वाझे काय लादेन आहे का ? असे म्हणतांना संविधान आठवले नाही ? अभिनेत्री कंगणा राणावत यांच्या घरावर बुलडोझर चालवतांना संविधान आठवले नाही?, असे अनेक प्रश्न एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उपस्थित केले.