मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ विरार येथे २१ मार्चला ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन !

डावीकडून सौ. धनश्री केळशीकर, श्री. जगदीश शास्त्री, श्री. प्रदीप तेंडोलकर (संबोधित करतांना), श्री. बळवंत पाठक आणि श्री. विजय जोशी

विरार – मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे, मंदिरहिताच्या दृष्टीने योजना आखणे आणि मंदिरांचे संघटन या उद्देशाने श्री जीवदानीदेवी संस्थान, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २१ मार्च या दिवशी विष्णुप्रतिभा बँक्वेट सभागृह, उत्कर्ष विद्यालयासमोर, विरार (प.) येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा आरंभ सकाळी ९.३० वाजता होईल. अधिवेशनाला पालघर जिल्ह्यातून २०० हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती श्री जीवदानीदेवी संस्थानचे अध्यक्ष आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य संयोजक श्री. प्रदीप तेंडोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. विरार येथील श्री जीवदानी संस्थानच्या कार्यलयात १७ मार्च या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेला वसई येथील श्री दिवाणेश्वर महादेव मंदिराचे प्रबंधक श्री. जगदीश शास्त्री, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई आणि पालघर जिल्हा समन्वयक श्री. बळवंत पाठक, सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर आणि श्री जीवदानीदेवी संस्थानचे विश्वस्त आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे पालघर जिल्हा संयोजक श्री. विजय जोशी उपस्थित होते.

 या वेळी हिंदू जनजागृती समितीचे मुंबई आणि पालघर जिल्हा समन्वयक श्री. बळवंत पाठक म्हणाले, ‘या अधिवेशनाला भगिरथी महाराज मानव सेवा संस्थानचे पू. काशीगिरी महाराज, मेढे (वसई) येथील ‘श्री परशुराम तपोवन आश्रमा’चे संस्थापक पू. भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, बोरिवली येथील श्री विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष हभप अरुण महाराज कदम, सप्तशृंगी देवस्थानचे अध्यक्ष श्री. सुदर्शन दहातोंडे, डहाणू येथील श्री हनुमान मंदिराचे विश्वस्त श्री. अशोक राजपूत, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता नीलेश पावसकर, मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या स्वाती दीक्षित, मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र-छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.’

या मंदिर परिषदेत मान्यवरांचे मार्गदर्शन, मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. यामध्ये ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे. ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी असून यामध्ये सहभागी होण्यासाठी 9273181385/ 9702698282 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर महासंघाने केले आहे.