पाकिस्तान भारताकडून गुप्तपणे साखर खरेदी करत असल्याचे उघड !

प्रतिकात्मक छायाचित्र

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान सार्वजनिकरित्या भारताशी कटुता असल्याचे दाखवत आहे; पण गुप्तपणे भारताकडून साखर खरेदी करत आहे, अशी माहिती पाकिस्तानी पत्रकार नुसरत जावेद यांनी दिली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकी पॉडकास्टर (मुलाखत घेणारा) लेक्स फ्रिडमन यांना दिलेल्या मुलखतीविषयी पाकिस्तानमध्ये नुसरत जावेद यांना प्रश्‍न विचारण्यात आला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.

नुसरत जावेद पुढे म्हणाले की, मी नरेंद्र मोदी यांचे म्हणणे ऐकले असून त्याविषयी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रियाही पाहिली आहे. आपण पुन्हा एकदा काश्मीरविषयी बोललो, जे गेल्या काही वर्षांत व्यापाराच्या संदर्भातही बोलत आहोत. पाकिस्तान सरकारने सातत्याने सांगितले आहे की, ‘जोपर्यंत काश्मीर प्रश्‍न सुटत नाही, तोपर्यंत आम्ही भारतासमवेत व्यापार करणार नाही.’ तथापि आजही पाकिस्तान भारताकडूनच साखर खरेदी करत आहे, ही वस्तूस्थिती आहे. हे  सत्य शाहबाज शरीफ यांच्या सरकारने पाकिस्तानच्या संसदेत अधिकृतरित्या सांगितले आहे. पाकच्या संसदेत सांगण्यात आले की, पाकिस्तानने मार्च २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत इतर देशांकडून ३ सहस्र १४० मेट्रिक टन साखर खरेदी केली आहे. त्याची किंमत ३० लाख अमेरिकी डॉलर्स आहे. पाकिस्तानने ज्या देशांकडून साखर खरेदी केली आहे, त्यात मलेशिया, जर्मनी, थायलंड, संयुक्त अरब अमिरात आणि भारत यांचा समावेश आहे. या सूचीत भारत ९ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने भारताकडून ५० सहस्र मेट्रिक टन आणि संयुक्त अरब अमिरातकडून ४४४ मेट्रिक टन साखर खरेदी केली आहे.

पाक सरकार जनतेला अंधारात का ठेवत आहे ? – पत्रकार जावेद

जावेद पुढे म्हणाले, सरकार आपल्यााला अंधारात का ठेवत आहे ? ‘जोपर्यंत काश्मीर प्रश्‍न सुटत नाही तोपर्यंत आपण त्यावर सहमत होणार नाही’, अशी चर्चा का चालू आहे ? जर सर्व तणाव असूनही चीन आणि भारत एकमेकांशी व्यापार करत असतील, तर पाकिस्तान अन् भारत का करू शकत नाही ? (पाकने व्यापार करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी भारताने ते नाकारलेच पाहिजे ! जिहादी आतंकवाद आणि व्यापार दोन्ही एकत्र होऊ शकत नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका

भारतही गुप्तपणे पाकला साखर पुरवतो, असेच यातून लक्षात येते ! मुळात ‘पाकिस्तानला भारत साखर का विकतो आहे ?’ असा प्रश्‍न उपस्थित होतो. भारताने पाकवर संपूर्णपणे बहिष्कार घालायला हवा असतांना ही गांधीगिरी का केली जात आहे ?