गंगेचे पाणी नव्हे अमृत !

गंगा ही सश्रद्ध भारतियांसाठी केवळ एक नदी नाही. ती जीवनदायिनी आणि मोक्षप्रदायिनी आहे. जे धर्म अवलंबतात, त्यात दैवी आणि मानवी मूल्ये यांना महत्त्व देतात, तसेच श्रद्धा अन् श्राद्ध ही दोन्ही मौलिक परिमाणे जीवनासाठी आवश्यक मानतात, त्या लोकांसाठी गंगा ही सर्वार्थाने ‘माता’ आहे. अखिल भारत खंडात सर्व नद्या या गंगास्वरूप आहेत ते याचमुळे. ज्यांना पाणी आणि जल यांतील भेद कळतो, त्यांच्यासाठी गंगा ही साक्षात् देवता आहे. ते तिला मातेस्वरूप देवता मानतात आणि म्हणतात; कारण सतत विस्तारणारे असे जे अस्तित्व आहे, ज्याला ‘ब्रह्म’ म्हटले जाते, त्या अस्तित्वाची जिवंत आणि दृश्य अशी देवता म्हणजे गंगा होय ! म्हणून गंगा ही जशी नद्यांशी संबंधित आहे, तशीच ती ‘अमृत वर्षावाशी’ आणि आकाशगंगेशीसुद्धा थेट संबंधित आहे.

गंगा ज्या लोकांनी गटार केली आणि तिला तसे संबोधले ते सगळे पापीच आहेत हे निःसंशय ! कारण ती सगळेच स्वीकारते. तिची ‘स्वीकारार्हता’ हा तिचा गुण आहे आणि त्यात चुका अन् अयोग्यता बघणारे हे जीवन ‘दर्शन’ या विषयाला मुकलेले पामर ! गंगा मूळची दूषित नाही आणि तिच्यात जे जे म्हणून दूषित करणारे येते ते ती पचवते; म्हणून ती महान अन् तिच्यावर दूषित वचने बोलणारे हे ‘लहानसहान’; पण यानिमित्ताने तिची शब्दपूजा बांधता येते, हेही नसे थोडके !

१. गंगेच्या जलात इतर नद्यांच्या तुलनेत प्राणवायूची पातळी २५ पट अधिक आढळणे

गंगेचे पाणी नव्हे, तर जल हे इतर नद्यांपेक्षा वेगळे आणि विशिष्ट गुणधर्मांनी युक्त मानले जाते. भारतात गंगा नदीला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीकोनातून पवित्र मानले जाते; परंतु त्यासह वैज्ञानिक संशोधनानेही या पाण्याच्या काही खास गुणधर्मांचा उलगडा केलेला आहे. ‘गंगेच्या जलात ‘ऑक्सिजन’ची (प्राणवायूची) पातळी सामान्य नद्यांच्या तुलनेत २५ पट अधिक असते. हा गुणधर्म हिमालयातील किरणोत्सारी खडक, जंगलातील झाडे आणि गार बर्फाचे पाणी यांच्या संयोगामुळे निर्माण होतो’, असे ज्युलियन हॉलिक यांच्या संशोधनातून समोर आले आहे. ‘ऑक्सिजन’ची ही उच्च पातळी पाण्यातील सेंद्रिय कचरा आणि बॅक्टेरिया वाढण्यास प्रतिबंध करते.

अमोल पाध्ये

२. प्रसिद्ध ब्रिटीश जीवशास्त्रज्ञ अर्नेस्ट हॅम्बरी हॅकिंग यांनी गंगेचे पाणी सूक्ष्मजंतूंना नष्ट करत असल्याविषयी केलेले संशोधन

अर्नेस्ट हॅम्बरी हॅकिंग हे १९ व्या शतकातील एक प्रसिद्ध ब्रिटीश जीवशास्त्रज्ञ आणि संशोधक होते. त्यांनी गंगेच्या पाण्याच्या अद्वितीय गुणधर्मांवर केलेले संशोधन आजही वैज्ञानिक आणि पर्यावरणीय अभ्यासात महत्त्वाचे मानले जाते. हॅकिंग यांचा जन्म ४ फेब्रुवारी १८६५ या दिवशी झाला. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य ‘सूक्ष्मजीवशास्त्र आणि जंतूविज्ञान’ या क्षेत्रात संशोधन करण्यात व्यतित केले. भारतात त्यांनी केलेल्या कार्यामुळे गंगेच्या पाण्याचे वैज्ञानिक महत्त्व जगासमोर आले.

हॅकिंग हे १८९० च्या दशकात भारतात ब्रिटीश सरकारच्या सेवेत कार्यरत होते. त्या वेळी ते मुंबई येथील सरकारी प्रयोगशाळेत रसायन आणि जीव शास्त्रज्ञ म्हणून काम करत होते. त्या काळात कॉलरा रोग भारतात मोठ्या प्रमाणात पसरला होता आणि त्याचे कारण अस्वच्छ पाणी हे होते; परंतु हॅकिंग यांनी निरीक्षण केले की, गंगेच्या जलाचा वापर करणार्‍या लोकांमध्ये कॉलराचा प्रसार अल्प झाला होता. यामुळे त्यांचे लक्ष गंगाजलाच्या गुणधर्मांकडे वळले.

अ. पाण्याची शुद्धता टिकवणे : हॅकिंग यांनी गंगेच्या पाण्यावर अनेक प्रयोग केले, ज्यात त्यांनी कॉलराचे जंतू (Vibrio cholerae) गंगेच्या पाण्यात मिसळून त्यांच्यावर होणारा परिणाम पडताळला. त्यांचे मुख्य संशोधन वर्ष १८९६ मध्ये प्रसिद्ध झाले, ज्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे निष्कर्ष मांडले.

(क्रमशः)

– अमोल पाध्ये, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य योग धाम, नाशिक.


लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/894196.html