कर्मकांडापेक्षा राज्यकारभाराच्या महत्त्वाविषयी जाणीव करून देणारे न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे आणि त्यानुसार आचरण करणारे पेशवे !

(कै.) विक्रम सावरकर

‘ब्राह्मणकुलोत्पन्न पेशवे राज्यकारभार करू लागले, तेव्हा ते प्रथम पूर्वपरंपरेने चालू असलेले संध्या-पूजा-अनुष्ठान आदी धार्मिक कर्तव्ये पार पाडत आणि नंतर दरबारात येऊन बसत. कर्मकांडाला उशीर झाल्यास दरबारातील लोकांना ताटकळत बसावे लागे. एकदा पेशव्यांचे न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे नियोजित वेळेत दरबारात आले. त्या वेळी त्यांना श्रीमंत पेशवे पूजादी कर्मकांडात मग्न असल्याने दरबारी येण्यास उशीर होत असल्याचे लक्षात आले. नंतर बर्‍याच उशिराने दरबारात आलेल्या श्रीमंत पेशव्यांना ते म्हणाले, ‘‘पूजेलाच प्राधान्य द्यायचे असेल, तर ब्रह्मावर्ती जाऊन तेथे उदंड धर्मकार्य करावे; परंतु कारभार चालवायचा असेल, तर पूजेचे कर्मकांड बाजूला ठेवावे लागेल.’’ न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांनी दिलेली ही परखड समज लक्षात घेऊन त्यापुढे पेशव्यांनी प्राथमिकतेने राज्यकारभाराला महत्त्व देऊन कारभार चालवला.’

– (कै.) विक्रम सावरकर, मुंबई

(साभार : मासिक ‘प्रज्वलंत’चा ‘अखंड हिंदुस्थान विशेषांक’, १५.८.२००२)