आजची आपली शिक्षणपद्धत इंग्रजांनी घालून दिलेल्या मार्गावरूनच चालत आहे. आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रमाण वाढत आहे आणि मराठी शाळा ओस पडत आहेत. ‘खरेतर मायबोलीतून शिक्षण हे पुष्कळ चांगले होते’, असे सर्व विद्वान आणि अभ्यासक सांगत असतात; परंतु त्याकडे विशेष कुणी लक्ष देत नाही.
१. इंग्रजी माध्यमातून शिकणार्या विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची अविभाज्य अंगे शिकवली न जाणे
इंग्रजांचा पगडा अजूनही आपल्या भारतातील लोकांच्या मनावर कायम आहे. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली, तरीसुद्धा आपली संस्कृती मुलांना कळेल, असे शिक्षण आपण मुलांना देत नाही. त्यासाठी कुठलाच राजकीय पक्ष पुढे येऊन विविध योजना राबवत नाही. आपले हिंदु सण, उत्सव, देवधर्म, शास्त्रीय संगीत, आयुर्वेद, योग ही सर्व भारतीय संस्कृतीची अविभाज्य अंगे आहेत. याचे प्रतिबिंब कुठल्याच शिक्षणपद्धतीत दिसत नाही. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना राम कोण ?, कृष्ण कोण ? आणि गायनाच्या प्रांतात सुधीर फडके कोण ?, भीमसेन जोशी कोण ? हे ठाऊक नसते. त्यांना भारतातील गायन, वादन, नृत्य, आयुर्वेद, योग, सण, संस्कृती यांतील काहीच ठाऊक नसते. रामायण आणि महाभारत यांतील गोष्टींचा त्यांना गंध नसतो. विमान, शून्य, गुरुत्वाकर्षण यांचा शोध आपल्या भारतियांनी लावला, हे त्यांना शिकवले जात नाही.
भास्कराचार्यांनी त्यांच्या ‘सिद्धांतशिरोमणि’ या ग्रंथात ‘पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण’ या विषयावर लिहिले आहे, ‘पृथ्वी आकाशातील पदार्थांना विशिष्ट शक्तीने आपल्याकडे खेचत आहे.’ त्यांनी ‘करणकौतूहल’ नावाचा दुसरा ग्रंथही लिहिला. ते त्याकाळचे सुप्रसिद्ध गणितज्ञ होते. ब्रह्मगुप्त नावाच्या विद्वान आणि गणितज्ञ यांनी सर्वप्रथम शून्य अन् त्याच्या सिद्धांतांना परिभाषित केले. विमानाचे उल्लेख रामायणात सापडतात. संतशिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांना न्यायला श्रीविष्णु विमानातून आले, असाही उल्लेख सापडतो.
२. सध्याच्या विद्यार्थ्यांची स्थिती
आज विद्यार्थ्यांना शाळेत अनेक विषय शिकवतात; परंतु ‘त्या विषयातील कोणते ज्ञान आपल्याला प्रतिदिनच्या व्यवहारात उपयोगी पडते’, हे त्यांना कळत नाही; म्हणून ते भ्रमणभाषचा आश्रय घेतात. भ्रमणभाषमधून त्यांना अनेक विषयांचे सखोल ज्ञान होऊ शकते; परंतु याकडे सुद्धा सध्याची मुले दुर्लक्ष करतात आणि भ्रमणभाषमध्ये असलेले खेळ घंटोन्घंटे खेळत बसतात. आई-वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे मुलांच्या सवयी काय ?, ते दिवसभर काय करतात ?, याकडे त्यांचे विशेष लक्ष नसते. आज-काल आजी-आजोबासुद्धा घरात नसतात. कदाचित् त्यांच्या मुलांना त्यांची अडचण होत असावी; म्हणून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली जाते. ‘कुणीतरी हे थांबवले पाहिजे’, असे मला वाटते. ‘याविषयी कुणीतरी जनजागृती करावी’, असे मला वाटते.
३. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून हिंदु धर्मग्रंथांविषयी प्रबोधन आणि मुलांकडून स्तोत्रे म्हणवून घेणे आवश्यक !

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाऊन मुलांना हिंदु धर्म, देवता, ग्रंथ यांविषयी शिक्षण द्यावे. किंबहुना त्यांच्या मनात निदान या ग्रंथांविषयी तरी कुतूहल जागे करायला हवे, असे वाटते. ‘दासबोध’, ‘भगवद्गीता’, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची ‘तुकाराम गाथा’, संत नामदेव महाराज यांची ‘गाथा’, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ या सर्वच ग्रंथांविषयी सर्व इंग्रजी माध्यमांतील बरीचशी मुले अनभिज्ञ असतात.
‘दासबोध’ हा इतका चांगला ग्रंथ आहे की, त्याचे शब्दांत वर्णन करणे अशक्यप्राय आहे. यातील काही श्लोक नियमितपणे घेतले आणि ते मुलांना शिकवले, तर नक्कीच मुलांना त्याविषयी आकर्षण निर्माण होईल. प्रतिदिन आई-वडिलांनी मुलांकडून ‘मनाचे श्लोक’, ‘रामरक्षा’ आणि ‘मारुतिस्तोत्र’ ही स्तोत्रे संध्याकाळच्या वेळेला म्हणवून घेतली, तर मुलांच्या मनावर त्याचे अत्यंत चांगले संस्कार होतील. आताच्या पिढीत श्री. समीर लिमये हे दासबोधाचा अत्यंत चांगल्यापैकी प्रचार करत आहेत आणि ते लहान मुलांमध्ये ‘दासबोध काय आहे’, याची जाणीव करून देण्याच्या प्रयत्नात आहेत.
४. लहान मुलांना भगवान श्रीकृष्ण आणि प्रभु श्रीराम माहिती होण्यासाठी…
अनेक ठिकाणी ‘भागवत कथा’ होत असतात; परंतु त्यासाठी किती लहान मुले तेथे उपस्थित असतात, हेसुद्धा आपण पाहिले पाहिजे. केवळ लहान मुलांसाठी भागवताची व्याख्याने मोठमोठ्या संस्थांनी आयोजित केली पाहिजेत, म्हणजे मुलांना भगवान श्रीकृष्णाविषयीची बरीच माहिती होईल. रामायणातील राम हा कोण होता ?, मारुति कोण होता ?, हेसुद्धा मुलांना कळले पाहिजे.
५. …अन्यथा येणारा काळ भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने चांगला नसेल !
भारतीय संस्कृतीत असलेले मंत्रशास्त्र, स्तोत्रे हीसुद्धा मुलांना कळली पाहिजेत; कारण या मंत्रांमध्ये सामर्थ्य असते. त्याचप्रमाणे अनेक स्तोत्रे ही इतकी रसाळ आहेत की, ३-४ वेळा म्हटल्यावर ती लगेचच तोंडपाठ होतात. ‘जर आजची पिढी यापासून वंचित राहिली, तर मात्र पुढे येणारा काळ हा भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने नक्कीच चांगला नसेल’, असे मला वाटते.
६. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती कळण्यासाठी शिक्षणपद्धतीत आमूलाग्र पालट करणे महत्त्वाचे !
आज भारतीय संस्कृती संपूर्ण जगात लोकप्रिय होत आहे. ‘शास्त्रीय संगीत’ हे संगीतोपाचारासाठी आदर्श मानले जाते. आज परदेशातील सहस्रो नागरिक हे भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहेत. भारतीय शास्त्रीय नृत्यही परदेशात मूळ धरत आहे. प्राणायाम, योगासने हीसुद्धा तिकडे नियमितपणे केली जातात; परंतु भारतात मात्र मुलांना यातील काहीच माहिती नसते; कारण बर्याचशा शाळांत हे विषय शिकवले जात नाहीत. यासाठी कला शिक्षक, योगा शिक्षक नेमलेलेच नसतात. आजही शाळेत ‘शारीरिक प्रशिक्षण’ या विषयाच्या तासिकेच्या वेळी कवायतीखेरीज काहीच शिकवले जात नाही. मुलांनाही या कवायती का करायच्या ?, त्याचे महत्त्व काय ?, हे कळत नाही. शासनकर्त्यांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून आणि भारतीय संस्कृती लक्षात घेऊन आजच्या ठोकळेबाज शिक्षणपद्धतीत आमूलाग्र पालट करणे राष्ट्रहिताचे ठरेल.
– (पू.) किरण फाटक, शास्त्रीय गायक, डोंबिवली.