
१. वास्तव ओळखून जगणारे अलबर्ट आईन्स्टाईन !
‘अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी आपल्या जगाचे चित्रच बदलून टाकले. परमाणूयुग, मग ते प्रगतीसाठी किंवा विनाशकारी असले, तरी त्याचे जनक आईन्स्टाईनच आहेत. ते परमाणू बॉम्बसंबंधीच्या संशोधनात व्यस्त होते. ते विनोदाने म्हणत असत, ‘‘जर माझे संशोधन आणि माझा सिद्धांत यशस्वी झाला, तर जर्मन लोक माझे ‘महान जर्मनवासी’ म्हणून अभिनंदन करतील अन् फ्रान्सवासी ‘आईन्स्टाईन विश्वाचा महान नागरिक आहे’, असे सांगतील. जर माझा सिद्धांत खोटा निघाला, तर हेच फ्रान्सवाले मला ‘जर्मनवासी’ म्हणतील आणि जर्मनीवाले मला ‘ज्यू (यहुदी)’ म्हणतील.’’
२. आईन्स्टाईन यांनी नवनिर्मित इस्रायलचे अध्यक्षपद नम्रपणे नाकारणे
नोव्हेंबर १९५२ मध्ये इस्रायलचे अध्यक्ष डॉ. चैम वेजमेन यांच्या मृत्यूनंतर इस्रायल सरकारने आईन्स्टाईन यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची प्रार्थना केली. त्या वेळी त्यांनी या प्रस्तावाला नम्रपणे नकार दिला. त्यांनी इस्रायल सरकारला कळवले, ‘मी आपल्या प्रस्तावाबद्दल पुष्कळ आभारी आहे; पण मी या पदासाठी पात्र नाही; कारण जनसेवा आणि राजनीती या क्षेत्रामध्ये मी स्वत:ला कणभरसुद्धा सक्षम किंवा कुशल समजत नाही.’ तेव्हा इस्रायलच्या नवनिर्मित ज्यू (यहुदी) सरकारला याचे आश्चर्य वाटले.’
(साभार : मासिक ‘कल्याण’, मार्च २०१७)