मंदिरांमधील अपप्रकार रोखा आणि मंदिरांच्या पावित्र्याचे संवर्धन करा !

मंदिर संस्कृतीचे रक्षण करतांना मंदिरांचे पावित्र्य जपले जावे, मंदिरांतील प्रथा-परंपरा अबाधित रहाव्यात, मंदिरांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा, यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. जसे घराची सजावट करायची असेल, तर केर काढावा लागतो; घरातील जे अडगळीचे सामान आहे, त्याची विल्हेवाट लावावी लागते; जर शरीर कमवायचे असेल, तर व्याधीनिर्मूलन करावे लागते, त्याप्रमाणे मंदिर संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य करतांना मंदिरांच्या संदर्भात जे अपप्रकार होतात, ते कटाक्षाने बंद करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. खरेतर मंदिरे ही आपली श्रद्धाकेंद्रे असल्याने त्यामध्ये कुप्रथा शिराव्यात किंवा त्या बोकाळाव्यात, असे आपल्याला कुणालाच वाटत नाही. आपण सर्वच जण त्या विरोधातच आहोत; पण कळत-नकळतपणे, मानापमानामुळे, संकुचितपणाच्या भावनेमुळे, अयोग्य दृष्टीकोनांमुळे किंवा धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आज काही मंदिरांमध्ये अपप्रकार घडत असलेले आढळतात.

१. मूर्तीला सांताक्लॉजचा वेश घालणे

गेल्या काही वर्षांपासून काही मंदिरांमध्ये देवाच्या मूर्तीला नाताळ सणाच्या निमित्ताने सांताक्लॉजचा वेश घालण्याची प्रथा पडली आहे. सुदैवाने याचे प्रमाण अधिक नाही; पण काही ठिकाणी बहुधा नावीन्यपूर्ण कल्पनेच्या नावाखाली मूर्तीला सांताक्लॉजचा वेश घातला जातो. मुळात सांताक्लॉज ही एक ख्रिस्ती कल्पना असून ते एक काल्पनिक पात्र आहे. त्याचा वेश हिंदूंच्या देवतांच्या मूर्तीला चढवून आपण नेमका काय संदेश देऊ पहात आहोत ? मंदिरात देवाच्या मूर्तीला जे वस्त्र चढवले जाते, त्यामागे काही आचार, शास्त्र आणि परंपरा आहे; पण आपल्या अज्ञानापोटी किंवा प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मंदिरात अशा कृती होत असतील, तर त्या थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. ते केले नाहीत, तर उद्या मोहरम किंवा ईदच्या दिवशी देवीच्या मूर्तीला बुरखा घातला जाईल ! काही ठिकाणी ‘देव म्हणजे आपला सखा-सोबतीच आहे’, अशा भावाने काही कृती केल्या जातात; उदाहरणार्थ, पुण्यातील सारसबागेतील गणपतीच्या मूर्तीला थंडीच्या कालावधीत स्वेटर घातला जातो. ‘देहाला ते देवाला’, अशी एक म्हणही आहे. काही जण थंडीच्या दिवसांत प्रतिदिनच्या देवपूजेतही मूर्तीला पाणी-दूध-पाणी यांचा अभिषेक करतांना ते थोडे कोमट करून घेतात. यामागचा भाव वेगळा आणि मूर्तीला सांताक्लॉजचे वस्त्र घालणे वेगळे ! त्यामुळे प्रसिद्धीच्या हव्यासापोटी किंवा अज्ञानापोटी मूर्तीची पारंपरिक वस्त्रे पालटली जात असतील, तर अशा कृती रोखायला हव्यात.

श्री. संजय जोशी

२. केक कापून देवाचा उत्सव साजरा करणे

आज-काल केक कापून देवाचा उत्सव साजरा करण्याची चुकीची प्रथा काही ठिकाणी चालू झाली आहे. एका मंदिराने दत्तजयंतीनिमित्त १५१ किलोचा केक कापून ती साजरी करण्याचा प्रकार घडला होता. श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथील श्री शनैश्चर हे जागृत देवस्थान आहे. तेथे गेल्या ३-४ वर्षांपासून पाश्चात्त्यांप्रमाणे केक कापून देवाचा उत्सव साजरा करण्याची अशास्त्रीय प्रथा चालू होती. हिंदु धर्मशास्त्रानुसार देवतेच्या प्रकटदिनी किंवा उत्सवांच्या वेळी विविध धार्मिक विधी प्रथा-परंपरेनुसार साजरे केले जातात. अशा विधींमुळे भाविकांनाही आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो; पण त्याऐवजी ‘केक कापून देवाचा उत्सव साजरा करणे’, ही पाश्चात्त्य कुप्रथा चालू केली, तर देवाची कृपा होईल कि अवकृपा ? या संदर्भात मंदिर महासंघाच्या वतीने ही केक कापण्याची प्रथा बंद करण्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. त्यानंतर ती प्रथा बंद झाली.

३. मंदिरांत इफ्तार मेजवान्यांचे आयोजन

सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली काही मंदिरांमध्ये इफ्तार मेजवान्यांचे आयोजन होतांना दिसून येते. अशा मंदिरांनी किमान बांगलादेशाच्या सद्यःस्थितीवरून तरी बोध घ्यायला हवा. ज्या बांगलादेशाला भारताने स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या बांगलादेशात आज हिंदूंची अनेक मंदिरे, संत-महंत यांच्यावर आक्रमणे केली जात आहेत. त्यामुळे सर्वधर्मसमभावाच्या भ्रामक कल्पनेतून किमान मंदिरांच्या पदाधिकार्‍यांनी तरी बाहेर येण्याची आवश्यकता आहे.

मंदिरात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी करायचे प्रयत्न

मंदिरातील अपप्रकार रोखण्यासाठी आपण विश्वस्त म्हणून काही उपाययोजना केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, मंदिराचा आर्थिक ताळेबंद व्यवस्थित ठेवणे, मंदिराशी संबंधित घटकांकडून भाविकांना त्रास होत नाही ना ?, हे पहाणे, तसेच भाविकांनाही शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणे, मंदिराचे पावित्र्य टिकून रहाण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी.

अपप्रकारांमुळे मंदिरांतील पावित्र्य तर कमी होतेच; पण असे अपप्रकार होऊ देणार्‍यांना पातकही मोठे लागते. त्यामुळे या अपप्रकारांच्या थांबवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. संपूर्ण व्यवस्थेत आमूलाग्र पालट होणे अशक्यप्राय आहे, असेही नाही. ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’, असे म्हणतात. जर काळोख घालवायचा असेल, तर ज्योत पेटवण्याची आवश्यकता असते. आपण प्रज्वलित केलेल्या ज्योतीने पूर्ण खोलीतील काळोख नाहीसा नाही झाला, तरी किमान आपल्या ज्योतीच्या अवतीभवतीचा परिसर तरी उजळेल. एका ज्योतीने दुसरी ज्योत पेटवत गेलो, तर परिसर प्रकाशमान व्हायला वेळ लागत नाही; कारण काळोख अशी काही वेगळी संकल्पना अस्तित्वातच नसते. प्रकाशाचा अभाव म्हणजे काळोख. काळोख घालवण्यासाठी ज्याप्रमाणे एक ज्योत तिचे योगदान देऊ शकते, त्याप्रमाणे आपल्यालाही या ज्योतीरूपच प्रयत्न करायचे आहेत. तसे प्रयत्न भक्त, साधक, धर्म आणि राष्ट्र प्रेमी यांनी करणे आवश्यक आहे.

– श्री. संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती, रत्नागिरी.

४. पूजा-आराधना यांचे व्यावसायीकरण

आज काही मंदिरांमध्ये पूजा किंवा आराधना यांचे व्यावसायीकरण झाले आहे. पूजा-अभिषेक यांसाठी काही मंदिरांमध्ये अवास्तव मूल्य आकारले जाते. ‘व्हीआयपी दर्शना’साठी अत्यधिक मूल्य आकारले जाते. देवासमोर सर्व समान असतात; पण ‘व्हीआयपी’ (महनीय) किंवा ‘व्हीव्हीआयपी’ (अतीमहनीय) दर्शनाच्या माध्यमातून अत्यधिक मूल्य आकारून एक वेगळीच प्रथा चालू झाली आहे. मंदिरांच्या बाहेर पूजोपयोगी साहित्याचे जे कक्ष लावलेले असतात, त्यांच्याकडूनही बर्‍याच वेळा अवाजवी मूल्य आकारले जाते. अशामुळे सर्वसामान्य भाविक पूजोपचारापासून दूर रहातो. त्यामुळे मंदिर आणि मंदिर परिसरात पूजा-उपासना यांचे व्यावसायीकरण तर होत नाही ना ?, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे; कारण शेवटी मंदिरे ही श्रद्धेचे केंद्र आहेत. तेथे आपल्याला जे दायित्व मिळाले आहे, ते अधिकारासाठी नाही, तर सेवेसाठी आहे.

५. दान दिलेल्या वस्तूंचा अयोग्य वापर

काही वेळा मंदिराला दान दिल्या गेलेल्या वस्तूंचाही अयोग्य वापर केला जातो. तेलंगाणा राज्यातील करीमनगर भागात श्री राजराजेश्वर स्वामी मंदिर आहे. या देवस्थानला भाविक गोदान करतात; पण या गायींची चक्क पशूवधगृहात विक्री केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या गोशाळेतील गायींच्या संदर्भातही अशाच प्रकारचा गलथान कारभार समोर आला होता. गोशाळेतील गायींना चाराही मिळत नव्हता. कागद, प्लास्टिक किंवा रुक्मिणीमातेला ओटी म्हणून भरलेले खण वगैरे गायींचे खाद्य बनले होते. पंढरपूरच्या मंदिरात देवाला अर्पण केलेले दागिने आणि अर्पण यांची मोजदाद करायला कुणी नाही; म्हणून ते पोत्यात भरून ठेवले होते. तुळजापूर येथील मंदिरात दानपेटीच्या रकमेत घोटाळा झाला होता. खरे तर भाविक जे दान देतात, त्याचा योग्य प्रकारे विनियोग व्हायला हवा; अन्यथा दान दिलेल्या वस्तूंचा अपवापर झाला किंवा त्याकडे दुर्लक्ष झाले, तर त्याचे पातक माथी येते. देवनिधीचा सत्कार्यासाठी किंवा धर्मकार्यासाठी विनियोग झाला पाहिजे; पण अनेक वेळा देवनिधीचा सामाजिक कार्यासाठी उपयोग होतांना दिसून येतो. देवनिधीतून मंदिराचा जीर्णाेद्धार, भाविकांसाठी सुविधा, गोशाळा, वेदपाठशाळा, धर्मजागृतीचे कार्यक्रम आदी स्वरूपाची कार्ये करता येऊ शकतात. यासाठी देवनिधीचा भावनिकतेतून व्यय होणार नाही, याकडे लक्ष द्यायला हवे. मंदिरांमध्ये व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नसल्याचे कारण सांगून सरकार मंदिर अधिग्रहित करते. प्रत्यक्षात सरकारने कह्यात घेतलेल्या मंदिरांमधील भ्रष्ट कारभाराची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. असे असले, तरी सरकारला मंदिर कह्यात घेण्याची संधी मिळणार नाही, यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

६. मानापमानामुळे मंदिराकडे दुर्लक्ष

विश्वस्तांमधील मानापमान नाट्यामुळे मंदिर व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याने काही ठिकाणी मंदिर बंद पडण्यासारखे प्रकारही घडत आहेत. विश्वस्त मंडळामध्ये २ गट पडतात किंवा विश्वस्त आणि पुजारी यांच्यामध्ये ताळमेळ रहात नाही. व्यक्तीचा अहंकार इतका मोठा होतो की, त्याच्यापुढे मंदिरही मागे पडते. अशी उदाहरणे प्रत्यक्षात घडलेली आहेत. अशा वेळी मानापमान बाजूला ठेवून ‘देव प्रथम, मंदिर प्रथम’, अशी भूमिका घेऊन कार्य होण्याची आवश्यकता आहे. जिथे अशा प्रकारची समस्या असेल, तेथे विश्वस्तांनी समोरासमोर बैठक घेऊन परिस्थितीवर तोडगा काढण्याचा, मध्यम मार्ग निवडण्याचा पर्याय वापरून पहावा किंवा त्याविषयी धार्मिक क्षेत्रातील जाणकारांचे मार्गदर्शन घ्यावे. आपल्यातील अहंकारामुळे भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणे, हे विश्वस्त किंवा मंदिरांचे पदाधिकारी या नात्याने आवश्यक आहे.

७. पुजार्‍यांकडून होणार्‍या अयोग्य कृती

मंदिरांमधील पुजारी हे त्या देवतेचे सेवक असतात; पण काही पुजार्‍यांमधील हा सेवाभाव नष्ट झाला आहे. अनेक ठिकाणी मूर्तीचे दर्शन हे पुजार्‍यांच्या अर्थार्जनाचे साधन बनले आणि त्यासाठी पुजारी प्रसंगी अयोग्य वर्तन करतात, असे दिसून येते. उदाहरणार्थ, श्रीकृष्ण भूमी वृंदावन येथील बांकेबिहारीच्या मंदिरात मूर्ती पडदा ओढून झाकली जाते.दर्शनाला आलेल्या भाविकांना तेथील पुजारी ‘किती रुपयांचा भोग लावणार ?’, असे विचारतात. भाविकांनी १००, २००, ५०० रुपये असे पैसे दिल्यानंतरच पडदा काढला जातो आणि मूर्तीचे दर्शन दिले जाते. जी व्यक्ती पैसे देत नाही, तिला मूर्तीचे दर्शन मिळत नाही. अनेक मंदिरांमध्ये देवदर्शन लवकर होण्यासाठी पुजारी पैसे घेतात. काही ठिकाणी पुजार्‍यांकडून ‘अमुक एक विधी केला, तर अमुक एक समस्या सुटेलच’, अशी हमी देऊन भाविकांची दिशाभूल केली जाते. प्रत्यक्षात कोणत्याही विधीची फलनिष्पत्ती अनेक घटकांवर अवलंबून असते. संबंधितांचे प्रारब्ध हाही एक मोठा घटक असतो; पण त्याकडे न पहाता ‘मार्केटिंग’च्या धर्तीवर काही ठिकाणी विधी करण्यासाठी दबाव टाकला जातो.

८. अस्वच्छतेचे साम्राज्य

काही मंदिरांमध्ये अस्वच्छता दिसून येते. अगदी गर्भगृहसुद्धा अस्वच्छ असते. गया येथील विष्णुपद मंदिरात असलेल्या विष्णुपदावर भाविक फळे, पूजासाहित्य आदी वस्तू अक्षरश: ओततात. त्यामुळे मंदिरांची प्रतिदिन स्वच्छता कशी होईल ?, यासाठीही आपण मंदिर पदाधिकारी म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

९. अपात्र व्यक्तींच्या नेमणुका

मंदिरामध्ये कुठल्याही नेमणुका करतांना वशिलेबाजीने न करता पात्र व्यक्तींच्या त्या ठिकाणी नेमणुका होणे आवश्यक आहे. अपात्र व्यक्तींच्या नेमणुकांचा थेट परिणाम मंदिराच्या ऊर्जेवर होतो. त्यामुळे या प्रकरणी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.

१०. अन्य

जत्रोत्सवामध्ये काही ठिकाणी जुगाराचे अड्डे असणे, मद्यपींनी देवालयामध्ये वास्तव्य करणे आदी अपप्रकारही मंदिर परिसरात घडतांना दिसून येतात. याविषयीही योग्य पाऊल उचलणे आवश्यक आहे.

– श्री. संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती, रत्नागिरी.