शिवनेरीवर (पुणे) ३९५ वा छत्रपती शिवाजी महाराज जन्‍मोत्‍सव सोहळा साजरा !

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुन्‍नर (पुणे) – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्‍मस्‍थान असलेल्‍या पुणे जिल्‍ह्यातील शिवनेरीवर ३९५ वा शिवजयंती सोहळा साजरा करण्‍यात आला. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्‍या हस्‍ते शिवजन्‍माचा पाळणा जोजवण्‍यात आला. त्‍यानंतर उपस्‍थित महिलांनी ‘शिवाजी’, ‘शिवाजी’ असा जयघोष करत नाव ठेवले. या वेळी सत्तारुढ सरकारमधील अनेक मंत्री, आमदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्‍थित होते.

शिवनेरीवर भव्‍य हिंदवी स्‍वराज्‍य महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले. महाराष्‍ट्र राज्‍य पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालय आणि पुणे जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने या विशेष सोहळ्‍याचे आयोजन करण्‍यात आले. संपूर्ण शिवनेरीवर विद्युत् रोषणाई करण्‍यात आली. शिवजन्‍मस्‍थान, शिवकुंज आणि शिवाईदेवी मंदिर यांना आकर्षक सजावट करण्‍यात आली.

शिवजन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने शिवप्रेमींना शुभेच्‍छा देऊन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित गड हे आमच्‍यासाठी मंदिरापेक्षाही मोठे आहेत. त्‍यांचे जतन आणि संवर्धन यांचे कार्य शासनाच्‍या वतीने सातत्‍याने चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्‍यासमवेत ते उत्तम प्रशासक होते. विविध व्‍यवस्‍थापनाचे गुरु होते. शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्‍य जनतेच्‍या सेवेसाठी दिले म्‍हणून आपण त्‍यांना ‘आदर्श राजा’, ‘जाणता राजा’, ‘श्रीमंत योगी’ म्‍हणून स्‍मरण करतो.’’

१२ गड, दुर्ग जागतिक वारसास्‍थळे होतील !

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या राज्‍यातील १२ गड, दुर्ग जागतिक वारसास्‍थळे नामांकनासाठी निवडले आहेत. हे गड, दुर्ग स्‍थापत्‍यशास्‍त्र, जलसंवर्धन, पर्यावरणाशास्‍त्राचे उत्तम नमुने आहेत. येत्‍या सप्‍ताहामध्‍ये पॅरिस येथील होणार्‍या महासभेत त्‍याचे सादरीकरण करण्‍यात येणार आहे. हे गड, दुर्ग जागतिक वारसास्‍थळे होतील आणि जगातील लोक ते पहाण्‍यासाठी येतील, असा विश्‍वास मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी व्‍यक्‍त केला.