लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – त्रिवेणी संगमावरचे पाणी स्नान आणि प्राशन करण्यासाठी चांगले आहे. प्रदूषण नियंत्रण कर्मचारी त्रिवेणी संगमावर काम करत आहेत. संगमावरील पाण्याविषयी चुकीचा प्रचार केला जात आहे. यात समाजवादी पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षाचे लोक सहभागी आहेत, असा आरोप उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत केला.
समाजवादी पक्षाच्या नेत्यांना अकबराचे किल्ले ठाऊक आहेत; मात्र अक्षय्यवट नाही !
समाजवादी पक्षाच्या नेत्यांना अकबराचे किल्ले ठाऊक आहेत; पण त्यांना अक्षय्यवट आणि सरस्वती कूप यांचे महत्त्व ठाऊक नाही. हे त्यांचे महाकुंभ आणि प्रयागराज यांविषयीचे सामान्यज्ञान आहे, अशी टीका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.
सरकार केवळ सेवक म्हणून महाकुंभाचे दायित्व पार पाडत आहे !
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आपण इथे चर्चा करत असतांना कोट्यवधी लोक श्रद्धेने महाकुंभामध्ये स्नान करत आहेत. हे आयोजन कोणत्याही सरकारचे नाही, तर समाजाचे आहे. सरकार केवळ सेवक म्हणून दायित्व पार पाडत आहे. आम्हाला आमच्या दायित्वाची जाणीव आहे. ज्यांना चेंगराचेंगरीमध्ये प्राण गमवावे लागले आहेत, त्यांच्याप्रती आमची सहानुभूती आहे.