परकीय आक्रमणकर्त्यांचे उदात्तीकरण करणे म्हणजे देशद्रोह ! – CM Yogi Adityanath

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विधान

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

बहराइच (उत्तरप्रदेश) – जेव्हा संपूर्ण जग भारताच्या संस्कृती आणि परंपरा यांचे कौतुक करत आहे, तेव्हा कोणत्याही परकीय आक्रमकाचे उदात्तीकरण करू नये. आक्रमकाचे उदात्तीकरण करणे म्हणजे देशद्रोहाचा पाया भक्कम करणे आहे.

स्वतंत्र भारतातील महापुरुषांचा अपमान करणार्‍या कोणत्याही देशद्रोही व्यक्तीला स्वीकारू शकत नाही, अशा शब्दांत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी औरंगजेब, तसेच महंमद गझनीचा पुतण्या सय्यद सालार मसूद गाझी यांचे नाव न घेता त्यांच्या समर्थकांवर टीका केली.

उत्तरप्रदेशातील संभल येथे गाझी याच्या नावाने गेली अनेक शतके मेळा आयोजित केला जात होता. त्याला यावर्षीपासून अनुमती नाकारण्यात आली आहे. याच गाझीचा मेळा बहराइच आणि बाराबंकी येथेही अयोजित केला जातो. बाराबंकी येथे त्याची कबर आहे. आता तेथेही अनुमती नाकारली जाईल, असेच मुख्यमंत्र्यांच्या वरील विधानांवरून स्पष्ट होत आहे. याच पार्श्‍वभूमीवर विश्‍व हिंदु परिषदेने बहराइच येथे गाझीचा मेळा आयोजित करण्यास अनुमती न देण्यासाठी प्रशासनाला निवेदन दिले आहे.