श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई
मुंबई – शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात वापरल्या जाणारी रासायनिक खते आणि औषधे यांच्या अतीवापराने भूजल प्रदूषित झालेले आहेत. त्यामुळे जनतेच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय भूजल मंडळाने प्रसिद्ध केलेल्या २०२४ च्या वार्षिक ‘भूजल गुणवत्ता अहवाला’तून ही माहिती समोर आली आहे. केंद्रीय भूजल मंडळाने देशातील ४४० जिल्ह्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील वर्धा, बुलढाणा, अमरावती, नांदेड, बीड, जळगाव आणि यवतमाळ या ७ जिल्ह्यांमध्ये भूजल पातळीत नायट्रेटचे प्रमाण वाढल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ते भूजल पिण्यायोग्य नाही. या संदर्भात राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करण्यात आली.
१. जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय मानक ब्युरो यांनी पिण्याच्या पाण्यातील नायट्रेटची मर्यादा ४५ मिलीग्राम प्रति लिटर इतकी निश्चित केली आहे. ७ जिल्ह्यांमधील पाण्याच्या नमुन्यांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक म्हणजेच ३५.७४ टक्के नायट्रेट आहे. हे विषारी रसायन आहे.
२. केवळ नांदेड जिल्ह्यात ३ सहस्र ८७७ पाण्याच्या नमुन्यांपैकी २ सहस्र २१० पाण्याचे नमुने सदोष आढळले. केवळ १ सहस्र ७६७ जलस्रोत पिण्यायोग्य आहेत.
अशा दूषित पाण्यामुळे ‘ब्लुबेरी सिंड्रोम’सारखे प्राणघातक आजार, तसेच साथीचे आजार होऊ शकतात.
![]() नायट्रेटयुक्त खते, रासायनिक खते, तसेच औषधे यांचा पिकांवर अतीवापर होत आहे. लोकांना गुणवत्तापूर्ण पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी ग्रामीण भागात नळ पाणीपुरवठा योजनांची कार्यवाही करण्यात येत आहे. प्रतीवर्षी पाण्याची तपासणी केली जाते. सलग २ वेळा रसायनिक पडताळणीत पाणी दूषित आढळल्यास पिण्याच्या पाण्याच्या स्रोताभोवती ‘पाणी पिण्यास अयोग्य’ असा फलक लावण्यात येतो. बाधित जलस्रोतांच्या संदर्भात उपाययोजना करण्यात येणार आहे. – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री |
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी न मिळणे हे लाजिरवाणे ! |