Sam Pitroda On China : (म्हणे) ‘भारताने चीनला शत्रू मानणे थांबवावे !’

काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांना चीनचा पुळका !

काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा

नवी देहली – काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ‘भारताने चीनला शत्रू मानणे थांबवावे’, असे त्यांनी म्हटले आहे. पित्रोदा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्यातील भेटीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे विधान केले. ‘पित्रोदा यांच्या वक्तव्याशी पक्ष सहमत नाही’, असे काँग्रेसने म्हटले आहे.

सॅम पित्रोदा म्हणाले

१. चीनने केलेली फसवणूक काय आहे, हे मला समजत नाही. चीनने आपली फसवणूक केल्याचे सूत्र ओढूनताणून सांगितले जाते. याचे कारण म्हणजे अमेरिकेने ‘शत्रू’विषयी निर्माण केलेली परिभाषा !

२. मला वाटते, सर्व देशांनी एकमेकांशी सहकार्य करण्याची वेळ आली आहे. चीन आपला शेजारी आहे. तो प्रगती करत आहे. आपण ही गोष्ट स्वीकारायला हवी.

भाजपकडून टीका

भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी

भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनी पित्रोदा यांच्यावर टीका केली आहे. ‘सॅम पित्रोदा यांनी असे वक्तव्य करून भारताची अस्मिता आणि सार्वभौमत्व यांच्यावर आघात केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, भारताचे चीनशी कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतच चीनच्या विरोधात आक्रमक धोरण राबवत आहे. काँग्रेसचे चीनशी साटेलोटे आहे, हेच यातून दिसून येते’, असे ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

  • वर्ष १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण करून जी भूमी बळकावली, त्याला तत्कालीन काँग्रेस सरकारने चीनच्या संदर्भात राबवलेले आत्मघातकी गांधीगिरी धोरण कारणीभूत होते. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्याची असली विधाने चीड आणणारी आहेत !
  • वर्ष २०२० मध्ये गलवान खोर्‍यातील चीन सैनिकांनी भारतीय सैनिकांवर केलेले आक्रमण भारतीय जनता विसरलेली नाही. चीन-लडाख सीमेवर चीनकडून चालू असलेले घुसखोरीचे प्रयत्न भारत विसरू शकत नाही. त्यामुळे असले राष्ट्रघातकी सल्ले देणार्‍यांवर सरकारने कारवाई करणे अपेक्षित आहे !