UP HIV Needle Inject Case : उत्तरप्रदेशामध्ये हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने महिलेला ‘एच्.आय.व्ही.’ बाधित सुई टोचली !

  • पोलिसांकडून ‘कौटुंबिक सूत्र’ सांगून गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ !

  • न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हुंड्याची मागणी पूर्ण करू न शकल्याने पत्नीला ‘एच्.आय.व्ही.’ बाधित करण्याची धक्कादायक घटना राज्यातील गंगोह येथून समोर आली आहे. पीडितेच्या वैद्यकीय अहवालात असे दिसून आले की, तिला बळजोरीने हानीकारक औषधांचे सेवन करायला लावल्याने, तसेच ‘एच्.आय.व्ही.’ बाधित सुई टोचल्याने तिला एड्स झाला. पीडितेचे वडील पोलीस अधीक्षकांपर्यंत जाऊनही सासरच्या मंडळींच्या विरुद्ध गुन्हा नोंद न झाल्याने शेवटी त्यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली. त्यावर न्यायालयाने सासरच्या मंडळींवर गुन्हा नोंद करण्याचा आदेश पोलिसांना दिला. त्यांच्याविरुद्ध हुंड्याची मागणी, मारहाण आणि पत्नीला एच्.आय.व्ही. बाधित केल्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पीडितेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीतील गंभीर सूत्रे !

१. पीडितेचा अभिषेक नावाच्या तरुणाशी १५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे विवाह झाला.

२. वधूच्या कुटुंबाने हुंडा म्हणून तब्बल ४२ लाख रुपयांच्या गोष्टी दिल्या होत्या. तथापि सासरच्या लोकांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी अतिरिक्त २५ लाख रुपये अन् एक मोठी चारचाकी देण्याचा आग्रह धरला.

३. मधल्या काळात तिला ३ वेळा घरी पाठवले आणि प्रत्येक वेळी ‘पंचायती’च्या (वडीलधारी मंडळींच्या) साहाय्याने पुन्हा सासरी नांदायला पाठवण्यात आले.

४. सासरच्या कुटुंबियांचे नाव खराब केल्यावरून आणि हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे तिला टोमणे मारणे, तसेच तिचे मानसिक खच्चीकरण केले गेले.

५. मे २०२४ मध्ये अभिषेक आणि त्याची बहीण यांनी तिला हानीकारक औषधे दिली. तसेच ‘एच्.आय.व्ही.’ बाधित सुईही टोचली. त्यामुळे तिच्या अंतर्गत अवयवांची हानी झाली. तिला घरातच कोंडून ठेवण्यात आले होते.

६. संधी मिळताच पीडिता घरून पळाली आणि माहेरी परतली.

७. पीडितेच्या वडिलांनी स्थानिक पोलिसांपासून सहारनपूरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांपर्यंत कारवाईची विनंती केली. तरीही ‘कौटुंबिक सूत्र’ असल्याचे सांगून सर्वच अधिकार्‍यांनी त्यांना कोणतीच दाद दिली नाही.

८. शेवटी पित्याने स्थानिक न्यायालयात कायदेशीर हस्तक्षेपासाठी याचिका केली. ६ फेब्रुवारीला न्यायालयाने गंगोह कोतवाली पोलिसांना अभिषेक, त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि इतर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.

संपादकीय भूमिका

  • हुंडाबळी कायदा असूनही अशा प्रकारच्या जाचक गोष्टी घडणे, यातून जनतेला कायद्याचे भयच राहिले आहे कि नाही, असा प्रश्न निर्माण होतो !
  • ‘एच्.आय.व्ही.’ बाधित सुई टोचून महिलेचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍यांच्या विरोधात तक्रार करण्यास टाळाटाळ करणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे !