Mahakumbh Hindu Rashtra Adhiveshan : महाकुंभपर्वात ‘हिंदु राष्ट्राच्या राज्यघटने’च्या प्रारुपाचे लोकार्पण !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

  • काली सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदु राष्ट्र अधिवेशनात झाला लोकार्पणाचा कार्यक्रम !

  • धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करून ते चालवण्यासाठी पुढाकार घेण्याचा संतांचा संकल्प !

हिंदु राष्ट्राच्या संविधानाचे प्रकाशन करतांना व्यासपीठावर उपस्थित संत-महंत

प्रयागराज (उत्तरप्रदेश), ४ फेब्रुवारी (वार्ता.) – कोट्यवधी हिंदूंची आस्था असलेल्या महाकुंभपर्वात काही दिवसांपूर्वी संतांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. याच्या पुढच्या टप्प्यात संतांच्या वंदनीय उपस्थितीत ४ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या प्रारुपाचे लोकार्पण करण्यात आले. काली सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदु राष्ट्र अधिवेशनात लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. सेक्टर ९ येथे शांभवी पीठाच्या काली सेनेच्या शिबिरामध्ये हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करून ते चालवण्यासाठी पुढाकार घेण्याचा संकल्प या वेळी उपस्थित संतांनी केला.

(डावीकडून) श्री. सुनील घनवट, सद्गुरु डॉक्टर चारुदत्त पिंगळे, आचार्य महामंडलेश्वर प्रकाश आनंद जी महाराज, आचार्य महामंडलेश्वर श्री श्री १००८ अवधूत बाबा अरुण गिरीजी महाराज, आचार्य महामंडलेश्वर जागृत चेतना गिरी, शांभवी पीठाधीश्वर श्री स्वामी आनंद स्वरुपजी महाराज, पूज्य त्रिलोकीनाथजी, स्वामी कामेश्वर पुरी जी महाराज, सद्गुरु नीलेश सिंगबाळ

या अधिवेशनात बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदूंवरील वाढते अत्याचार; बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांमुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेला निर्माण झालेला धोका; काशी, मथुरा यांसह अन्य मंदिरांच्या मुक्तीचा कायदेशीर लढा; हिंदु मंदिरांचे सरकारीकरण; भारतभर उत्सवांच्या वेळी हिंदूंवर होत असलेली आक्रमणे; लव्ह जिहाद, धर्मांतर, आतंकवाद, दंगली आदी समस्यांवर संत-महंतांनी विचारमंथन केले.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी अधिवेशनाचे सूत्रसंचालन केले. अधिवेशनात ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘सनातन वैदिक हिन्दू धर्म की जय हो’, ‘जय श्रीराम’, ‘भारत हिन्दू राष्ट्र है’, ‘हिन्दू राष्ट्र होगा’ अशा संत आणि भाविक यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

अधिवेशनाला उपस्थित हिंदु भाविक

काली सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सर्व संतांचा पुष्पहार, शाल, आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी अधिवेशनाचा उद्देश सांगितला. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’ला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘सनातन प्रभात’चे मुख्य वार्ताहर श्री. प्रीतम नाचणकर यांनी हिंदु राष्ट्र कार्यातील ‘सनातन प्रभात’ च्या योगदानाची माहिती दिली.

श्री. सुनील घनवट

‘हम हिन्दू हैं’ गीताचे लोकार्पण ! 

हिंदूंचे क्षात्रतेज करणारे स्वामी आनंदस्वरूप लिखित ‘हम हिन्दू हैं’ या गीताचे या वेळी लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी हे गीत लावण्यात आले. या वेळी सर्वांनी हात उंचावून आणि हिंदु राष्ट्राचा जयघोष करत या गीताला प्रतिसाद दिला.

हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये ‘हिंदू’ हे केंद्रबिंदू असतील ! – प.पू. स्वामी आनंदस्वरूप महाराज, संस्थापक, काली सेना

प.पू. स्वामी आनंदस्वरूप महाराज

ज्या कामाला मी आरंभ केले आहे, ते मी पूर्ण करणार आहे. वर्ष २०३० पूर्वी भारत हिंदु राष्ट्र घोषित होणे, हे माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. स्वातंत्र्यानंतर गुरुकुल शिक्षणपद्धती बंद करण्यात आली. राज्यघटनेमुळे शाळांमध्ये धर्मशिक्षण देण्यास प्रतिबंध आहे. उत्तरप्रदेशात ३ कोटी मुसलमान आहेत. त्यांच्यासाठी २२ सहस्र मदरसे आहेत. मुसलमानांना मदरशांमध्ये इस्लामविषयीचे शिक्षण दिले जात आहे. हिंदूंना किमान ८ वर्षे गुरुकुलामध्ये शिक्षण मिळायला हवे. याविषयी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. गुरुकुलामध्ये शिक्षण दिले गेले, तरच व्यभिचार, बलात्कार, भ्रष्टाचार बंद होतील. भारताच्या सध्याच्या राज्यघटनेमध्ये १०० हून अधिक पालट करण्यात आले आहेत; परंतु भगवद्गीतेमध्ये कधी सुधारणा झाली आहे का ? सध्याच्या राज्यघटनेमध्ये हिंदूंना दुय्यम मानले गेले आहे. हिंदु राष्ट्रातील राज्यघटनेचा केंद्रबिंदू हिंदू असतील. धर्मांतरित व्यक्तींना मतदान करण्याचा अधिकार नसेल. हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेत कोणत्याही धर्माला विरोध नसेल. हिंदु राष्ट्राची राज्यघटना हे रामराज्याचे स्वरूप असेल.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी सामर्थ्यशाली व्हावे ! – महंत स्वामी कामेश्‍वरानंद सरस्वती महाराज, पंचदशनाम जुना आखाडा

महंत स्वामी कामेश्‍वरानंद सरस्वती महाराज

‘सेक्युलर’ शब्दामुळे हिंदू निष्क्रीय झाले आहेत. घर सिद्ध करतांना ज्याप्रमाणे अनेक वस्तूंची आवश्यकता असते, त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीही विविध योगदानांची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धनाची आवश्यकता लागेल. तसेच कौशल्ययुक्त पिढीच्या निर्मितीचीही आवश्यकता आहे. केवळ कल्पना करून चालणार नाही. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी सामर्थ्यशाली व्हावे.

हिंदु राष्ट्राची स्थापना भगवंताच्या आशीर्वादाने पूर्ण होईल ! – डॉ. उमेशचंद्र शास्त्री, स्वामी वामदेव ज्योतिर्मठ, वृंदावन

डॉ. उमेशचंद्र शास्त्री

केवळ मार्गदर्शन करून नव्हे, तर हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील व्हावे लागेल. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे लागेल. वर्ष २०३० पर्यंत हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. संतांनी हाती घेतलेले हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य भगवंतांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भगवान परशुरामाप्रमाणे क्षात्रतेज दाखवावे लागेल ! – पंडित सुनील भराला, संस्थापक, राष्ट्रीय परशुराम परिषद

पंडित सुनील भराला

भगवान परशुरामाने २१ वेळा दुष्ट क्षत्रियांचा सर्वनाश केला. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भगवान परशुरामांचा परशु दिव्य स्वरूपात आपल्या हातात प्राप्त होणार आहे. हिंदु धर्माला नष्ट करण्यासाठी जे कार्यरत आहेत, त्यांना नष्ट करण्यासाठी हिंदूंना भगवान परशुरामांप्रमाणे क्षात्रतेज दाखवावे लागेल.

मेकॉलेप्रणीत नव्हे, तर गुरुकुल शिक्षणपद्धतीद्वारेच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य ! – श्री श्री श्री १००८ आचार्य महामंडलेश्‍वर जाग्रत चेतनागिरि महाराज

श्री श्री श्री १००८ आचार्य महामंडलेश्‍वर जाग्रत चेतनागिरि महाराज

कुंभमेळ्यातून ‘हिंदु राष्ट्रा’चे फलक हटवण्यात आले. भारतामध्ये हिंदु राष्ट्राचे फलक हटवले जात असतील, तर हिंदु राष्ट्राची स्थापना कशी होणार ? हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी राज्यतंत्र आणि धर्मतंत्र यांचे एकत्रीकरण आवश्यक आहे. धर्मस्थापनेसाठी हिंदूंना शक्तीची आवश्यकता आहे. गुरुकुल शिक्षणपद्धती आणि मातृशक्ती यातूनच हिंदूंना शक्ती प्राप्त होईल. मेकॉलेप्रणीत नव्हे, तर गुरुकुल शिक्षणपद्धतीद्वारेच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संपूर्ण भारतात ‘दिग्विजय यात्रा’ काढावी ! – गोविंदानंद सरस्वती, दंडी स्वामी, ज्योतिर्मठ

गोविंदानंद सरस्वती

कोणतेही कार्य शास्त्रप्रमाणित असायला हवे. आदि शंकराचार्यांनी शास्त्राच्या आधारेच सनातन धर्माविषयी जागृती केली. त्यांनी हिंदु राष्ट्राच्या पुर्नस्थापनेसाठीच चार पीठांची निर्मिती केली. भगवान श्रीकृष्ण आणि प्रभु श्रीराम यांनी धर्माच्या रक्षणासाठीच अवतार घेतला. हिंदू स्वधर्माला विसरले आहेत. त्यांना सनातन हिंदु धर्माची आठवण करून देणे, हे संतांचे कार्य आहे. हिंदु राष्ट्राच्या जागृतीसाठी संपूर्ण भारतामध्ये ‘दिग्विजय यात्रा’ काढण्यात यावी. यासाठी संतांनी पुढाकार घ्यावा.

कुंभमेळ्यात मांडलेली हिंदु राष्ट्राची संकल्पना पूर्णत्वास जाईल ! – महामंडलेश्‍वर प्रकाशानंद गिरि महाराज, आवाहन आखाडा

महामंडलेश्‍वर प्रकाशानंद गिरि महाराज

कुंभमेळ्यातून जेव्हा संदेश जातो, तेव्हा परिवर्तन होते. कुंभमेळ्यामध्ये संतांनी केलेल्या संकल्पामुळेच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आता हिंदु राष्ट्रासाठी कुंभमेळ्यामध्ये उद्घोष झाला आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य पूर्णत्वास जाईल.

संतांच्या नेतृत्वाखालीच पुन्हा हिंदु राष्ट्राची संस्थापना होईल ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

काली सेनेद्वारे प्रसारित केलेले हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेचे प्रारूप म्हणजे आपण हिंदु राष्ट्राच्या सीमेवर असल्याचे द्योतक आहे. ही सीमा पार करून आपणाला हिंदु राष्ट्रात पाऊल टाकायचे आहे. सनातन धर्मावर प्रत्येक युगात आघात झाले आहेत. त्या वेळी रक्षणासाठी संतांनी नेतृत्व घेऊन हिंदु राष्ट्राच्या संस्थापनेसाठी पुढाकार घेतला. आता पुन्हा हिंदु राष्ट्राच्या संस्थापनेसाठी संतांनी पुढाकार घेतला आहे. संतांच्या नेतृत्वाखालीच पुन्हा हिंदु राष्ट्राची संस्थापना होईल.

हिंदुत्वासाठी संतांनी संसदेत जाण्याची आवश्यकता ! – स्वामी नामदेवदास त्यागी (कम्पुटरबाबा)

स्वामी नामदेवदास त्यागी

हिंदुत्वासाठी आतापर्यंत संतांनी अनेक आंदोलने केली आहेत. संसदेत पारित होत नाही, तोपर्यंत कायदा होत नाही. हिंदु हिताचे कायदे करायचे असतील, तर संसदेत संतांची आवश्यकता आहे. राष्ट्रासाठी काही करायचे असेल, तर संतांनी संसदेत निवडून जाण्याची आवश्यकता आहे.

संतांच्या मार्गदर्शनाने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी योद्धा म्हणून कार्य करू ! – स्वामी विशालानंद महाराज

स्वामी विशालानंद महाराज

स्वातंत्र्यानंतर हिंदूंवर काळे कायदे थोपवले गेले. ‘पूजास्थळ कायदा, १९९१’ यांसारख्या कायद्यांमुळे हिंदूंच्या मंदिरांचे अस्तित्व नष्ट झाले. मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे आणि त्यासाठी राज्यघटनेची आवश्यकता आहे. संतांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना करू आणि त्यासाठी एक योद्धा म्हणून कार्य करू.

हिंदु राष्ट्रासाठी सर्व संतांचे आशीर्वाद ! – आचार्य महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ अवधूतबाबा अरुणगिरिजी महाराज (एन्व्हार्यन्मेंट बाबा)

आचार्य महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ अवधूतबाबा अरुणगिरिजी महाराज

मुगलांनी आक्रमण केले, तेव्हा पंचदशनाम जुना आखाड्याच्या नागा साधूंनी त्यांच्याशी युद्ध करून देशाचे रक्षण केले. हिंदु राष्ट्रासाठी सर्व संतांचे आशीर्वाद आहेत.

धर्मशिक्षण, धर्मजागृती तथा हिंदूसंघटन यांद्वारे हिंदु राष्ट्राची स्थापना होणार ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१८ व्या शतकापर्यंत भारत एक स्वयंभू हिंदु राष्ट्र आणि आर्थिक महासत्ता होता. त्या काळी भारत वैश्‍विक व्यापारात अग्रस्थानी होता. आज ‘सेक्युलर’ शासनप्रणालीमुळे आपली स्थिती काय झाली आहे ? आज अन्य पंथियांच्या देशात त्या त्या पंथाच्या लोकांची प्राधान्याने काळजी घेतली जाते; परंतु भारत हिंदूबहुल असतांनाही हिंदुहिताचे रक्षण केले जात नाही. त्यामुळेच भारत हिंदु राष्ट्र होणे आवश्यक आहे. धर्मशिक्षण, धर्मजागृती तथा हिंदूसंघटन यांद्वारे हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे हिंदु समाज आणि देश यांना वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे.