मल्हारपेठ (सातारा) येथे बनावट नोटा वितरीत करणार्‍याला व्यापार्‍यांनी रंगेहात पकडले !

सातारा, २३ एप्रिल (वार्ता.) – पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे किराणा मालाच्या बदल्यात १०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा देत होता. हे व्यापार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यास रंगेहात पकडून पोलिसांच्या कह्यात दिले; मात्र एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.

मल्हारपेठ बाजारपेठेतील २ किराणा मालाच्या दुकानात २ संशयित खरेदीच्या उद्देशाने आले होते. खरेदी करून झाल्यानंतर त्यांनी १०० आणि २०० रुपयांच्या नोटा व्यापार्‍यांना दिल्या. त्या बनावट असल्याचे व्यापार्‍यांच्या लक्षात आले. त्यांनी पाठलाग करून संशयितांना पकडून मुख्य चौकात आणले आणि याविषयी जाब विचारला. या वेळी मुख्य चौकात गर्दी झाल्यामुळे त्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला; मात्र दुसर्‍या संशयिताला पोलिसांच्या कह्यात देण्यात आले. या वेळी त्याच्याकडून १००, २०० आणि ५०० रुपयांच्या ५० सहस्र रुपये किमतीच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. दोघेही संशयित अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पिरेवाडी या गावातील आहेत. (बनावट नोटांचे जाळेच नष्ट करणे आवश्यक ! – संपादक)