सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर मंदिरात वस्त्रसंहिता लागू

सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर मंदिर

मालवण –  येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्री शिवराजेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणार्‍यांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय श्री शिवराजेश्वर देवस्थान समितीने घेतला आहे. ‘मंदिरात प्रवेश करतांना अंगप्रदर्शन करणारा अशोभनीय किंवा असभ्य पोशाख परिधान करू नये’, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यात बांधलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्री शिवराजेश्वर मंदिर आहे. या किल्ल्याला आणि मंदिराला प्रतिवर्षी लाखो पर्यटक भेट देऊन छत्रपती शिवरायांचे दर्शन घेतात. सध्या आधुनिकतेच्या नावाखाली मंदिरांत जातांना अशोभनीय पोषाख परिधान केला जात असल्याचे निदर्शनास येते. या पार्श्वभूमीवर श्री शिवराजेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.

याविषयीचा फलक मंदिर परिसरात लावण्यात आला आहे. यावर ‘मंदिरात प्रवेश करतांना फाटकी जीन्स्, हाफपॅन्ट, स्कर्ट, घट्ट कपडे, मौजे, बूट किंवा हॅट (टोपी) घालून मंदिरात प्रवेश करणे टाळावे. ‘गडकोटांचा पवित्र वारसा जपूया !  महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृती टिकवूया !’, असा संदेश लिहिण्यात आला आहे.