S Jaishankar On Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची काही सूत्रे भारतासाठी चौकटीच्या बाहेरील असू शकतात ! – डॉ. एस्. जयशंकर

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

नवी देहली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प राष्ट्रवादी आहेत. ‘गेल्या ८० वर्षांपासून अमेरिकेने एकप्रकारे संपूर्ण जगाचे दायित्व घेतले आहे, जे निरुपयोगी आहे’, असे ट्रम्प यांना वाटते. ‘जगात अमेरिकेकडून जो खर्च केला जातो तो अमेरिकेतच केला पाहिजे’, अशी त्यांची विचारसरणी आहे. आमच्या दृष्टीने भारताचे अमेरिकेशी चांगले संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्रम्प यांच्याशी वैयक्तिक स्तरावर चांगले संबंध आहेत. ट्रम्प यांची काही धोरणे भारतासाठी ‘आऊट ऑफ सिलॅबस’ (चौकटीच्या बाहेरील) असू शकतात, अशी माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे दिली. ते देहली विद्यापिठाच्या हंसराज महाविद्यालयात विद्यार्थ्यांसमेवत झालेल्या संवाद सत्रात बोलत होते. या वेळी विद्यार्थ्यांनी डॉ. जयशंकर यांना अमेरिकेच्या संदर्भात प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी वरील माहिती दिली.

अमेरिकेशी काही सूत्रांवर सहमत असू, तर काहींवर असहमत !

डॉ. जयशंकर यांनी मान्य केले की, ट्रम्प यांच्या अनेक धोरणांमुळे जागतिक घडामोडींमध्ये महत्त्वपूर्ण पालट होऊ शकतात. ते अनेक गोष्टी पालटतील. कदाचित् काही गोष्टी चौकटीच्या बाहेरील असतील; पण देशहिताच्या दृष्टीने परराष्ट्र धोरणांच्या संदर्भात आपण खुले असले पाहिजे. अशी काही सूत्रे असू शकतात ज्यावर आम्ही सहमत नसू; परंतु अशी अनेक क्षेत्रे असतील जिथे गोष्टी आमच्या कार्यक्षेत्रात असतील.

भारतीय नसलेलेही आता स्वत:ला भारतीय म्हणवत आहेत !

डॉ. जयशंकर यांनी भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाबद्दल सांगितले की, भारतीय नसलेलेही आता स्वत:ला भारतीय म्हणवत आहेत. ‘परदेशात रहाणारे भारतीय अजूनही त्यांच्या साहाय्यासाठी भारतावर अवलंबून आहेत. जो देशाबाहेर जातो, तोच आमच्याकडे येतो. आम्ही बाहेरचे रक्षक आहोत’, असेही डॉ. जयशंकर यांनी सांगितले.