प्रयागराज कुंभपर्व २०२५
स्वामी भरतर्षभा दास, ‘अक्षयपात्र फाउंडेशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष

प्रयागराज, ३१ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्री येणार्या भाविकांना २ वेळचा शुद्ध महाप्रसाद मिळावा, त्यांना जेवणाची कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ‘अक्षयपात्र फाउंडेशन’कडून महाकुंभक्षेत्री प्रतिदिन ३० सहस्र भाविकांसाठी अन्नदान सेवा करण्यात येत आहे. ‘अक्षयपात्र फाउंडेशन’ ही इस्कॉनशी संलग्न संस्था आहे, अशी माहिती ‘अक्षयपात्र फाउंडेशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी भरतर्षभा दास यांची ‘सनातन प्रभात’ला दिली. या वेळी त्यांनी ‘अक्षयपात्र’च्या स्वयंपाकगृहात नेऊन तेथे अन्न बनवण्याची प्रक्रिया कशी केली जाते ? याविषयीही सविस्तर माहिती दिली.
प्रभु श्रीला प्रभुपाद यांच्या प्रेरणेने हे कार्य चालू !

श्री. भरतर्षभा दास पुढे म्हणाले की,
३२ वर्षांपासून मी या सेवेत आहे. येथे कुंभमेळ्यातील ‘अक्षयपात्र फाउंडेशन’च्या मंडपाची व्यवस्था पहात आहे. प्रभु श्रील प्रभुपाद यांच्या प्रेरणेने हे कार्य चालू करण्यात आले आहे. वर्ष १९७१, तसेच वर्ष १९७७ च्या महाकुंभामध्ये त्यांनी भाग घेतला होता. तेव्हापासून ही अन्नदानसेवा चालू आहे. अन्नदानसेवा ही आमच्यासाठी मुख्य सेवा आहे. सर्वांना पौष्टिक अन्न मिळावे, या उद्देशाने हे कार्य चालू आहे.

प्रतिदिन दिवसभर दिले जात आहे पूर्ण भोजन !

अक्षय पात्र सकाळी ९ ते रात्री ९ असे पूर्ण दिवस चालते. एका थाळीमध्ये चपाती, भाजी, भात, डाळ आणि गोड पदार्थ दिले जातात. ‘अक्षयपात्र फाउंडेशन’ देशभरात प्रतिदिन २२ ते २३ लाख मुलांना अन्नदान करते. ही सेवा १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेश येथे केली जात आहे. तेथील सर्व यांत्रिकी सामग्री वापरून महाकुंभ येथे अन्नदान करत आहोत. महाकुंभामध्ये १५ सहस्र लोकांसाठी प्रतिदिन अन्नदान होत आहे. सेक्टर ४ मध्ये फिरते स्वयंपाकगृह चालू आहे. तिथेही १० ते १५ सहस्र लोकांसाठी अन्नदानाचे कार्य चालू आहे.
पूर्वनियोजन असल्याने अन्न वाया जात नाही !

प्रतिदिन अन्नदान होत असलेल्या संख्येवरून आमचे पुढचे नियोजन होत असल्याने भगवंतकृपेने अन्न वाया जात नाही. सेवा करण्यासाठी जवळपास ६०-७० लोक सेवा करत आहेत. अनेक जणांच्या माध्यमातून आम्हाला साहाय्य होत आहे, तसेच ‘हुडको, ‘अक्शन टेसा’ यांसह अन्य संस्था आम्हाला महाकुंभमेळ्यात आर्थिक स्वरूपात योगदान करत आहेत. आमची ही अन्नदानाची सेवा पूर्ण नियोजन करून केली जात असल्याने वाहतुकीच्या अडचणी अथवा अन्य अडचणींचा आमच्यावर परिणाम होत नाही.