पुणे महापालिकेने अतिरिक्‍त पाणी वापरल्‍याने जलसंपदा विभागाने पाठवली थकबाकीची नोटीस !

पुणे : अतिरिक्‍त पाण्‍याचा वापर आणि पाणी प्रदूषित केल्‍याप्रकरणी जलसंपदा विभागाने महापालिकेला ७१४ कोटी रुपयांच्‍या थकबाकीची नोटीस पाठवली आहे. या व्‍यतिरिक्‍त चालू वर्षाची थकबाकी १७४ कोटी रुपये आहे. या थकबाकीपोटी महापालिकेने तातडीने २०० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणीही जलसंपदा विभागाने केली आहे. शहराची वाढती लोकसंख्‍या लक्षात घेता जलसंपदा विभागाकडून २१ टी.एम्.सी. पाणी मिळावे अशी मागणी महापालिकेने केली आहे; मात्र खडकवासला प्रकल्‍पातून पिण्‍यासाठी ११.५० टी.एम्.सी. पाणी संमत केले आहे. त्‍यातील ६.५० टी.एम्.सी. सांडपाणी प्रक्रिया करून सिंचनासाठी कालव्‍यामध्‍ये उपलब्‍ध करून देणे महापालिकेला बंधनकारक केले आहे; मात्र महापालिका संमत कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलत आहे. वर्ष २०१६ पासून नियमबाह्य आणि मापदंडापेक्षा अतिरिक्‍त पाणी वापर केल्‍यामुळे महापालिकेने दंडात्‍मक पाणीपट्टी करणे बंधनकारक असून अद्याप कोणताही दंड त्‍यांनी जमा केला नाही, तसेच गेल्‍या १९ वर्षांत महापालिकेने प्रक्रिया केलेले पाणी जलसंपदा विभागाला दिले नाही, असा आरोप जलसंपदा विभागाने केला आहे. महापालिका आयुक्‍तांशी चर्चा केली असून वर्गणीतून थकबाकीपोटी काही रक्‍कम जलसंपदा विभागाला दिली जाईल, असे महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी स्‍पष्‍ट केले. जलसंपदा विभागाशी चर्चा करण्‍यासाठी वेळ मागितला असून त्‍यातून निश्‍चितच मार्ग काढण्‍यात येईल, असे ते म्‍हणाले.

संपादकीय भूमिका

महापालिकेलाच थकबाकीची नोटीस पाठवावी लागत असेल, तर प्रशासन अन्‍यवेळी कसा कारभार करत असेल ? याला उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !