Mahakumbh Stampede : महाकुंभ दुर्घटना : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा न्यायालयीन चौकशीचा आदेश !

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

प्रयागराज – महाकुंभपर्वातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी ३ सदस्यीय न्यायालयीन चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. माजी न्यायाधीश हर्ष कुमार हे या चौकशी आयोगाचे अध्यक्ष असतील, तर माजी महासंचालक व्ही.के. गुप्ता आणि निवृत्त आयएएस् डी.के. सिंह यांचा आयोगात समावेश असेल. हा आयोग कालमर्यादेत त्याचा अहवाल सादर करेल. पोलीसही या दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास करणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे.

चौकशी वेळेत पूर्ण करणार ! – माजी न्यायाधीश हर्ष कुमार

चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी दिलेल्या समयमर्यादेत पूर्ण केली जाईल, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती हर्ष कुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी सरकारने आयोगाला एक महिन्याचा कालावधी दिला आहे. आयोगाचे सदस्य ३१ जानेवारीला घटनास्थळी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.