कल्पद्रुम मैदानावरील अयोध्या नगरीत श्रीराम राज्याभिषेक जल्लोषात साजरा !

सांगली – सांगलीतील विश्रामबाग येथील कल्पद्रुम मैदानावर २६ जानेवारीला श्रीराम कथेच्या अंतिम दिनी पू. समाधान महाराज शर्मा यांनी रावणाचा वध, त्यानंतरचे श्रीरामाचे अयोध्येत आगमन आणि अयोध्येचा राजा म्हणून श्रीरामाचा झालेला राज्याभिषेक ही कथा सादर केली. ‘श्रीरामाचा जयघोष’ करत सहस्रो भाविक-भक्तांच्या उपस्थितीत श्रीरामाचा राज्याभिषेक नाटिकेच्या स्वरूपात सादर करण्यात आला. पुष्पवृष्टीसह वाद्यांच्या गजरात हा श्रीराम राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात पार पडला.

या सोहळ्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आवर्जून उपस्थित राहिले होते. या प्रसंगी ते म्हणाले, ‘‘सांगलीसारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात श्रीराममंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन होणे ही पुष्कळ मोठी गोष्ट आहे. याचे आयोजन ही हिंदु धर्मासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.’’ या प्रसंगी अपक्षचे खासदार विशाल पाटील, सम्राट महाडिक, भाजपच्या सौ. नीता केळकर, पू. झेंडे महाराज, श्री. लक्ष्मण नवलाई, श्री. राहुल ढोपे-पाटील, कार्याध्यक्ष श्री. मनोहर सारडा यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.