प्रयागराज – झाशी रेल्वेस्थानकातून प्रयागराजला जाणार्या रेल्वेगाडी क्रमांक ११८०१ वर हरपालपूर स्थानकात दगडफेक करण्यात आली. महाकुंभसाठी प्रयागराजला जाण्यासाठी हरपालपूर रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवासी जमले होते; पण रेल्वेगाडी आधीच प्रवाशांनी भरली होती. रेल्वेगाडीतील प्रवाशांनी डब्यांचे दरवाजे उघडले नाहीत. यामुळेच स्थानकावरील प्रवाशांचा जमाव संतप्त झाला आणि त्यांनी दगडफेक तसेच गाडीची तोडफोड चालू केली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. ८ ते १० जणांनी केलेल्या आक्रमणामुळे रेल्वेगाडीच्या प्रवासी घाबरले होते. आक्रमणकर्त्यांनी त्यांचे चेहरे कपड्याने झाकलेले होते. ही घटना २७ जानेवारीच्या रात्री १० ते ११ च्या वेळेत घडली. स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमॅरे, तसेच लोकांच्या भ्रमणभाषमध्ये बनवलेल्या व्हिडिओंच्या आधारावर पुढील कारवाई केली जात आहे.