बृहन्मुंबई महानगरपालिकेचा निर्णय
मुंबई – दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात धुळीमुळे प्रदूषण वाढत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाने भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईतील पर्यावरण तज्ञांनी केलेल्या शिफारशीनुसार तात्काळ कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिवाजी पार्क परिसरात मातीच्या धुलीकणांमुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मैदानाला भेट देऊन धुळीच्या समस्येवर १५ दिवसांत आराखडा सिद्ध करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या होत्या. प्रभावी निराकरण पद्धत अमलात आणून प्रदूषण नियंत्रणात आणण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले होते.
धुळीमुळे होणार्या प्रदूषणावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या उद्देशाने प्रशासनाकडून भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) येथे कार्यरत पर्यावरण तज्ञ प्रा. वीरेंद्र सेठी यांचा सल्ला घेण्यात आला. त्यांनी काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत यामध्ये आल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा उपाययोजनांची शिफारस केली आहे.
अल्पकालीन उपाययोजनांमध्ये धुलीकणांचे उत्सर्जन रोखण्यासाठी आणि वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे सुचवण्यात आले आहे. यात रोलर संयंत्राचा वापर करणे, धूळ नियंत्रणात ठेवून माती स्थिर ठेवण्यासाठी सातत्याने पाण्याची फवारणी करणे यांचा समावेश आहे.