भारताच्या नभोमंडलातील एक तेजस्वी नक्षत्र ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ !

आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…

‘भारताच्या नभोमंडलातील तेजस्वी नक्षत्र असलेले राष्ट्रपुरुष नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ या दिवशी ओडिशाच्या कटकमधील एका बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे एक सुप्रसिद्ध अधिवक्ता, तर माता प्रभावती धर्मपरायण सद्गृहिणी होत्या. नेताजी सुभाषचंद्र यांनी दिलेला ‘जयहिंद’ हा जयघोष राष्ट्रीय जयघोष झाला. ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’, (तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन) या उद्घोषामुळे सहस्रो युवक देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या महायज्ञात आत्माहुती देण्यास सिद्ध झाले होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस

१. नेताजींचे शिक्षण

नेताजींचे प्राथमिक शिक्षण कटकमध्ये झाले. ‘प्रेसिडेन्सी महाविद्यालया’त शिकत असतांना विद्यार्थ्यांचे नेतृत्व केल्यामुळे त्यांना एक वर्षासाठी महाविद्यालयातून काढण्यात आले होते. त्या वेळी भारतात स्वातंत्र्यलढा चालू होता. सुभाषबाबूंनी सैनिकी प्रशिक्षण घेण्यासाठी सेनेत प्रवेश मिळवण्याची परीक्षा दिली होती; परंतु त्यांची नेत्रदृष्टी क्षीण असल्यामुळे त्यांना प्रवेश दिला नाही. शेवटी त्यांनी प्रादेशिक सेनेत प्रवेश घेतला आणि त्याच वेळी अभ्यास करून ‘कलकत्ता विश्वविद्यालया’त कलेच्या पदवी परीक्षेत द्वितीय स्थान प्राप्त करून उत्तीर्ण झाले.

२. सुभाषबाबूंचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडून ‘फॉरवर्ड ब्लॉक’ची स्थापना करणे !

सुभाषबाबूंना सरकारी सनदी अधिकारी (आय.सी.एस्.) बनवण्याची त्यांच्या वडिलांची इच्छा होती; म्हणून त्यांनी सेनेची नोकरी सोडून दिली आणि १५.९.१९१९ या दिवशी ते इंग्लंडला गेले. वर्ष १९२० मध्ये गुणवत्ता सूचीमध्ये चौथे स्थान प्राप्त करून त्यांनी ‘आय.सी.एस्.’ परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर सुभाषबाबूंनी त्यांचे ज्येष्ठ बंधू शरतचंद्र यांना पत्र लिहून कळवले, ‘मी सरकारी सनदी अधिकारी बनून इंग्रजांची गुलामी करणार नाही.’ नंतर त्यांनी ‘आय.सी.एस्.’ सेवेचे त्यागपत्र दिले. या निर्णयाचे माता प्रभावतीने कौतुक केले. वर्ष १९२१ मध्ये सुभाषबाबू भारतात परतले आणि ते स्वातंत्र्यलढ्यातील तत्कालीन प्रमुख पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी जोडले गेले.

म. गांधींच्या उदारतावादी मवाळ विचारांशी सुभाषबाबू सहमत नव्हते; परंतु ते त्यांचा आदर करत होते. गांधीजींना ‘महात्मा’ असे सर्वप्रथम सुभाषबाबूंनीच संबोधित केले होते. सुभाषबाबूंवर स्वातंत्र्यसैनिक देशबंधू चित्तरंजन दास यांचा पुष्कळ प्रभाव होता. सुभाषबाबूंनी वर्ष १९२२ चे ‘असहकार आंदोलन’, वर्ष १९२८ चे ‘सायमन परत जा !’, इत्यादी आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घेतला. त्यांनी कलकत्ता महानगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या रूपात अनेक लोकोपयोगी कार्य केले. वर्ष १९३८ मध्ये सुभाषबाबू काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले; परंतु गांधीजी त्यांच्याशी सहमत नव्हते. गांधीजींनी पट्टाभिसितारामैय्या यांना सुभाषबाबूंच्या विरोधात उभे केले होते. शेवटी त्या निवडणुकीत सुभाषबाबूच विजयी झाले. गांधीजींनी याला स्वतःचा व्यक्तीगत पराजय मानून काँग्रेसच्या त्यागपत्राचा प्रस्ताव मांडला. कवी रविंद्रनाथ ठाकूर, मेघनाद साहा इत्यादींशी परामर्श केल्यानंतरही गांधीजी सुभाषबाबूंशी सहमत झाले नाहीत; म्हणून सुभाषबाबूंनी स्वतःच त्यागपत्र दिले आणि ‘फॉरवर्ड ब्लॉक’ ही संघटना बनवली.

३. ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना आणि त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांवर केलेली आक्रमणे 

सुभाषबाबू कुशल कूटनीतीज्ञ होते. त्यांनी दुसरे महायुद्ध हे भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुवर्णसंधी मानली आणि हिटलर, मुसोलिनी यांची भेट घेऊन इंग्रजांच्या विरुद्ध त्यांना साहाय्य करण्यात सहभागी करून घेतले. वर्ष १९४३ मध्ये सुभाषबाबूंनी जपानला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी साहाय्य करण्यात सहभागी करून घेतले. जपानमध्ये मूळ भारतीय असलेले युद्धबंदी सैनिक आणि प्रवासी भारतीय युवक यांच्या सहकार्याने नेताजींनी ‘आझाद हिंद सेनेची’ स्थापना केली. ५ जुलै १९४३ या दिवशी सिंगापूरच्या ‘टाऊन हॉल’च्या समोर आझाद हिंद सेनेच्या सर्वाेच्च सेनापतीच्या रूपात सैन्याला संबोधित करतांना ‘देहली चलो’ हा नारा दिला आणि जपानच्या सैन्यासह ब्रह्मदेशासहित (बर्मा) इंफाळ अन् कोहिमा यांवर एकाच वेळी आक्रमण केले. २१ ऑक्टोबर १९४३ या दिवशी सुभाषबाबूंनी स्वतंत्र भारताचे स्थायी सरकार असलेल्या ‘आझाद हिंद सरकार’ची स्थापना केली. या सरकारला जर्मनी, जपान, फिलीपाइन्स, कोरिया, चीन, इटली, मांचुको आणि आयर्लंड या देशांनी मान्यता दिली. जपानने त्याच्या अधीन असलेली अंदमान आणि निकोबार द्वीपे या सरकारला दिली. वर्ष १९४४ मध्ये आझाद हिंद सेनेने पुन्हा ब्रिटीश सैन्यावर आक्रमण केले आणि भारतातील काही भूप्रदेश इंग्रजांपासून मुक्त करून भारतात प्रवेश केला; परंतु त्याच वेळी महायुद्धामध्ये जर्मनी, जपान अन् इटली यांचा दारुण पराभव झाल्यामुळे इंग्रजांना भारताच्या बाहेर हुसकावून लावण्याचे अंतिम युद्ध अयशस्वी झाले.

४. …आणि उत्कृष्ट प्रतिभाशाली, कुशल कूटनीतीज्ञ हरपला !

२३ ऑगस्ट १९४५ या दिवशी जपानमध्ये टोकियोच्या जवळ एक सैनिकी विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानात जपानच्या सैन्याधिकार्‍यांसह नेताजीसुद्धा प्रवास करत होते. या दुर्घटनेत नेताजी घायाळ झाले किंवा त्यांचा मृत्यू झाला, याविषयी आजही संभ्रम आहे. भारतमातेच्या या उत्कृष्ट प्रतिभाशाली, कुशल कूटनीतीज्ञ, संघटक, रणनीतीज्ञ आणि लोकप्रिय स्वातंत्र्यसैनिकाच्या जन्मदिवशी प्रेरणा घेत त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालण्याचा संकल्प करूया.’

– अधिवक्ता नवीन कुमार, सहसंपादक, मासिक ‘गीता स्वाध्याय’.

(साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’)