‘झिया चॅरिटेबल ट्रस्ट’च्या भ्रष्टाचाराचे प्रकरण !
ढाका – बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान आणि ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बी.एन्.पी.)च्या अध्यक्षा खालिदा झिया यांना नुकतेच तेथील सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना २०१८ मध्ये ‘झिया चॅरिटेबल ट्रस्ट’च्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने दोषी ठरवून १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. खालिदा झिया मार्च १९९१ ते मार्च १९९६ आणि पुन्हा जून २००१ ते ऑक्टोबर २००६ पर्यंत बांगलादेशाच्या पंतप्रधान होत्या.
Former Prime Minister of Bangladesh Khaleda Zia acquitted!
Supreme Court’s verdict in the case of corruption in ‘Zia Charitable Trust’.
PC: @NewsX pic.twitter.com/fShW2Bnu5Y
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 16, 2025
१. बांगलादेशी माध्यमांच्या वृत्तानुसार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डॉ. सय्यद रेफत अहमद यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने हा निर्णय दिला.
२. सर्वोच्च न्यायालयाने ‘झिया चॅरिटेबल ट्रस्ट’च्या भ्रष्टाचार प्रकरणात खालिदा झिया यांच्यासह ‘बी.एन्.पी.’चे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान आणि इतर सर्व संशयित यांना निर्दोष मुक्त केले. ‘हा खटला सूडबुद्धीने प्रेरित होता’, असे न्यायालयाने म्हटले आहे.
३. वर्ष २०११ मध्ये भ्रष्टाचारविरोधी आयोगाने माजी पंतप्रधान तथा ‘झिया चॅरिटेबल ट्रस्ट’च्या सचिव खालिदा झिया आणि इतर २ आरोपी यांच्या विरोधात अज्ञात स्रोतांकडून पैसे गोळा करण्यासाठी अधिकारांचा गैरवापर केल्याविषयी तेजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट (दाखल) करण्यात आला होता.
४. ढाक्यातील विशेष न्यायालयाने खालिदा झिया यांना ८ फेब्रुवारी २०१८ या दिवशी ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली, तसेच झिया यांचा मुलगा तारिक आणि माजी मुख्य सचिव कमालुद्दीन सिद्दीकी यांच्यासह इतर ५ आरोपी यांना १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. आरोपींपैकी तारिक, सिद्दीकी आणि झिया यांचा पुतण्या मोमिनुर रहमान अजूनही पसार आहेत.
५. खालिदा झिया यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ३० ऑक्टोबर २०१८ या दिवशी उच्च न्यायालयाने खालिदा झिया यांची शिक्षा १० वर्षांपर्यंत वाढवली. यानंतर झिया यांनी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
६. सर्वोच्च न्यायालयाने झिया यांची याचिका ११ नोव्हेंबर २०२४ या दिवशी स्वीकारली होती आणि या खटल्याच्या अंतिम सुनावणीपर्यंत शिक्षेला स्थगिती दिली. ७. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया उपचारासाठी लंडनला गेल्या आहेत.