गोव्यातील सध्या (चर्चच्या अजेंड्यावरील) रोमी लिपीच्या देशघातकी मागणीमागील छुपा उद्देश !

‘भारतीय कोकणी भाषेसाठी भारतीय देवनागरी लिपी असतांना गोवा राज्यात परदेशी रोमी लिपीला मान्यता मिळायला हवी’, या मागणीला विशिष्ट गोटातून पुढे आणले जात आहे. विशिष्ट ग्रामपंचायतींचे ठराव करून पाठिंबा दर्शवण्याचे प्रयोग चालले आहेत. सरकार पक्षातील आमदारही या मागणीला पाठिंबा देऊ लागलेले आहेत. ही नुसती साधी अन् सामान्य मागणी नसून यामागे अराष्ट्रीयीकरणाचे फार मोठे कारस्थान आहे. हेच रोमी लिपीचे कारस्थान नागालँड, मिझोराम, मेघालयात खासी गारो वनवासी भागात चर्च मिशनरींनी यशस्वी करून अंततः इंग्रजी राज्यभाषा बनवली, ही वस्तूस्थिती गोव्यातील मराठी आणि कोकणी भाषेच्या सच्च्या मातृभाषाप्रेमींनी लक्षात घेतलीच पाहिजे.

भारतीय कोकणी भाषेसाठी भारतीय देवनागरी लिपी असतांना गोवा राज्यात परदेशी रोमी लिपीला मान्यता मिळायला हवी’, या मागणीला विशिष्ट गोटातून पुढे आणले जात आहे – संबंधितांची काळे कपडे घालून निदर्शने

१. आसाममधील ‘बोडो’ भाषेवर रोमीचा प्रयोग

बोडो भाषेसाठी प्रारंभी सामी लिपी वापरात होती. देशाच्या राष्ट्रभाषेशी नाते जुळावे म्हणून ‘बोडो साहित्य सभा’ या स्वायत्त मंडळाने देवनागरी लिपी वापरात आणण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला; परंतु चरफडलेल्या मिशनरी पाद्र्यांनी तिथे रोमी लिपी आणण्यासाठी धार्मिक भावना चिघळवण्याचा प्रयत्न केला. बोडो साहित्य सभेत धर्माच्या नावावर उभी फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न भारताच्या सुदैवाने आणि मिशनरी पाद्र्यांच्या दुर्दैवाने अयशस्वी झाला. बोडो साहित्य सभेत प्रचंड बहुमताने रोमीचा पराभव होऊन देवनागरीला मान्यता मिळाली. आज पूर्व प्राथमिकपासून इयत्ता १० वीपर्यंतच्या शाळा सरकारी अनुदानाने तेथील स्वायत्त ‘टेरिटोरियल डिस्ट्रिक्ट कौन्सिल (टीडीपी)’च्या (भारतातील स्वायत्त प्रशासकीय विभागाच्या) वतीने देवनागरी बोडो माध्यमांमध्ये उत्तमरित्या चालू आहे. राष्ट्रीयतेच्या या यशामुळे संतापून रोमी समर्थकांनी ६ मासांच्या आत बोडो साहित्य सभेचे राष्ट्रवादी अध्यक्ष बसु मतारी यांची हत्या केली.

प्रा. सुभाष वेलिंगकर

२. मेघालयातील ‘हाजोंग’ भाषेवर मिशनरींचा प्रहार

दुसरे उदाहरण मेघालयातील हाजोंग भाषेचे ! तिच्या ‘आसामी’ लिपीऐवजी रोमी लिपी आणावी, अशी मागणी मिशनरींनी पेरलेल्या ३ युवकांनी ‘हाजोंग साहित्य सभे’त वर्ष २००६ मध्ये केली. हाजोंग साहित्य सभेचे अध्यक्ष अर्णब हाजोंग यांनी ती जाहीररित्या धुडकावल्यामुळे त्याच संध्याकाळी त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. मिशनरी पाद्रींच्या दबावाखाली पोलिसांनी ही केस दडपली; परंतु त्यानंतर देशी लिपी समर्थकांनी संघटित होऊन त्यांनी ही केस पुन्हा उघडायला सरकारला भाग पाडले.

३. मिशनरींनी ‘खासी’ भाषेची बंगाली लिपी संपवली !

खासी भाषेला भारतीय बंगाली लिपी होती; परंतु मिशनरी पाद्रींनी त्यांच्या शाळांतून सक्तीने रोमी लिपी लादली. याच्या विरोधात प्रारंभी प्रचंड विरोध झाला; परंतु वर्ष १८४० मध्ये पाद्री थॉमस जॉन याने रोमी लिपी मान्य करून घेतली आणि स्थानिक कर्बी, दिमासा, राभा या स्थानिक वनवासी भाषांच्या मूळ भारतीय लिपींचे उच्चाटन केले. त्यामुळे परकीय रोमी लिपी लादण्यात ख्रिस्ती मिशनरी यशस्वी ठरले. धर्मांतर करून ख्रिस्ती बनवलेल्या भारतीय प्रजेचा भारतीयत्वाशी जोडलेला शेवटचा धागाही ख्रिस्ती मिशनरींनी कापला.

४. सगळीकडे पद्धत एकच !

आपल्या स्वदेशी भाषा आणि त्यांच्या भारतीय लिपी यांद्वारे बाटवलेल्या ख्रिस्त्यांची अन् तत्सम इतरांची भारतीयत्वाशी जोडली गेलेली नाळ टप्प्याटप्याने कापणे, ही एकच अराष्ट्रीयीकरणाची पद्धत चर्च संस्थेकडून मुबलक वा दबाव टाकण्यास पुरेशी ख्रिस्ती लोकसंख्या असलेल्या भारताच्या भागांमध्ये अनुकरण करण्यात येत आहे. रोमी लिपीतून भारतीय भाषांचे साहित्य पुरेशा प्रमाणात निर्माण करणे आणि रोमीची मागणी अन् तिचे समर्थन यांसाठी नेमका हाच आधार घेणे, हे अन्य भारतीय भाषांविषयीही  मिशनरींनी चालवले आहे !

५. लिपीच का ?

भारतीय भाषाच हळूहळू शक्य तिथे नष्ट करण्याचे आव्हान देशभर मिशनरी पाद्रींनी उभे केले आहे. गोव्यात भारतीय कोकणी भाषेसाठी पोर्तुगीजांनीच आणलेल्या परदेशी रोमी लिपीला मान्यता देण्यासाठीच्या मागणीची पूर्वपीठिका ही अशी आहे. हे देशावर निष्ठा असलेल्या सर्व कोकणीप्रेमींनी जसे लक्षात ठेवले पाहिजे, तसेच राष्ट्रीयतेचा सौदा करून धूर्तपणे पुढे फेकलेले ‘राज्यभाषा मान्यते’चे गाजर धुडकावून खर्‍या राष्ट्रवादी मराठीप्रेमींनीही जागृत आणि स्वाभिमानी रहाणे नितांत आवश्यक आहे.

– प्रा. सुभाष वेलिंगकर, निमंत्रक, हिंदु रक्षा महाआघाडी, गोवा.

संपादकीय भूमिका

भारतीय भाषेद्वारे देशावर आक्रमण करू पहाणार्‍या मिशनर्‍यांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर उपाययोजना करणे आवश्यक !