यंदाचा भव्य-दिव्य होणारा प्रयागराजचा (उत्तरप्रदेश) ‘महाकुंभ’ !

प्रयागराजमधील पोलीस पथक आणि त्यांची विशेष उपकरणे यांची पहाणी करतांना  उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

१. कुंभक्षेत्राचे रात्री दिसणारे मनोहारी दर्शन

कुंभक्षेत्राचे दिवसाप्रमाणे आता रात्रीही मनोहारी दर्शन होणार आहे. येथे ६७ सहस्रांहून अधिक पथदिवे लावण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त पुष्कळ मोठ्या क्षेत्रावर प्रकाश मिळण्यासाठी ‘हाय मास्ट’ दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ८५ हून अधिक वीजस्थानके कार्यरत आहेत.

१ सहस्र ५३० कि.मी. लांब वीजवाहक तारांचे जाळे सिद्ध करण्यात आले असून ४ लाख ७१ सहस्र वीजजोडण्या दिल्या जात आहेत. अद्याप काही भागांमध्ये दिवसा वीज नसते, तर सायंकाळी ६ ते पहाटेपर्यंत वीज असते. विजेच्या संदर्भातील अडचणी सोडवण्याचे काम प्राधान्याने करण्यात येत आहे. या वेळेचे विजेसाठी ३९१ कोटी ४ लाख रुपयांचे प्रावधान (तरतूद) करण्यात आले आहे.

कुंभक्षेत्रातील वीज गेल्यास ती अर्ध्या सेकंदात पुन्हा कार्यान्वित करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली असून काही मोक्याच्या जागी विद्युत् जनित्रांची (जनरेटरची) व्यवस्था करण्यात आली आहे.

२. ‘टेंट सिटी’ (तंबूंचे नगर)

महाकुंभमध्ये लोकांना रहाण्याची सुविधा होण्यासाठी एक मोठ्या ‘टेंट सिटी’चे निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये सामान्य तंबूंपासून  अलिशान तंबूंचा समावेश आहे. एकूण १ लाखांहून अधिक तंबूंची निर्मिती करण्यात आली आहे. सर्वांत सामान्य, म्हणजे ‘डिलक्स टेंट’, ‘प्रिमिअम टेंट’ आणि ‘आलिशान टेंट’ यांचा समावेश आहे. त्यांचे भाडे ५ सहस्र रुपयांपासून ५० सहस्र रुपयांपर्यंत आहे. त्याचप्रमाणे राजयोगी स्नान, म्हणजे अमृत स्नानाच्या वेळी त्यांचे भाडे आणखी अतिरिक्त असणार आहे. १० लाखांहून अधिक भाविकांना ही ‘टेंट सिटी’ आश्रय देऊ शकेल. त्या व्यतिरिक्त अतीमहनीय व्यक्तींसाठी वेगळी ‘टेंट सिटी’ सिद्ध करण्यात येत आहे. ‘डोम’प्रमाणे तंबूंची रहाण्यासाठी सुविधा आहे, ज्यांचे भाडे १ लाख रुपयांपर्यंत आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या आरामदायी सुविधांचा समावेश आहे.

३. महाकुंभातील रंगरंगोटी

महाकुंभासाठी प्रयागराज रेल्वेस्थानकापासून कुंभनगरीपर्यंत वाटेतील भिंती, चौक यांवर विविध देखावे रंगवण्यात येत आहेत. यासाठी एकूण १ सहस्र ५०० कलाकार, सहकलाकार आणि कारागीर कार्यरत आहेत. उद्यानांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या चौकांच्या ठिकाणी सितार, देवतांचे देखावे, पौराणिक कथा सांगणार्‍या मूर्तींची रचना करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त २०० हून अधिक बोटी रंगवण्यात आल्या आहेत.

४. कुंभमेळ्यातील सुरक्षाव्यवस्था

कुंभमेळ्यात एकूण ५६ पोलीस ठाणी आणि १४४ पोलीस चौक्या बनवण्यात आल्या आहेत. उत्तरप्रदेशातील कानपूर जिल्ह्यात सर्वाधिक, म्हणजे ५२ पोलीस ठाणी आहेत, तर कुंभमेळ्यात त्याहून अधिक ठाणी आहेत. येथे सुरक्षा व्यवस्थेचे दायित्व सांभाळण्यासाठी साधे पोलीस, पी.एस्.सी. (प्रादेशिक पोलीस), एन्.एस्.जी. (राष्ट्रीय सुरक्षा दल), एस्.टी.एफ्. (विशेष कृती दल), होमगार्ड, डिफेन्स (संरक्षण दल) आणि एन्.जी.ओ. (स्वयंसेवी संस्था) असे मिळून ६० सहस्रांहून अधिक पोलीस सुरक्षाव्यवस्था पहाणार आहेत. या वेळी कुंभमेळ्यात सुरक्षेसाठी मनोरे उभारले आहेत. त्यावर पोलीस चढून सहजपणे ये-जा करणार्‍यांवर लक्ष्य ठेवू शकतात.

कुंभमेळ्यात ‘एआय’ कॅमेरे (कृत्रिम बुद्धीमत्ता असलेले छायाचित्रक) लागले आहेत, जे लोकांची डोकी मोजतात. एखाद्या भागात २ सहस्र लोकांची क्षमता आहे आणि तेथे १ सहस्र ५०० लोक असतील, तर त्याची सूचना दिली जाईल नियंत्रण कक्षाला, जेणेकरून तेथे अधिक लोकांना पाठवता येईल. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती काही गैरप्रकार करत असेल, तर त्याच्यावर लक्ष्य ठेवता येईल.

कुंभमेळ्यासाठी एकूण ७ स्तरीय सुरक्षाव्यवस्था आहे. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’द्वारे (कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे) शोध, पोलीस नियंत्रण कक्षातून २ सहस्र ७०० हून अधिक छायाचित्रकांद्वारे लक्ष ठेवणे, शहरात प्रवेशद्वारांवर पडताळणी, कुंभमेळ्याच्या वाहनतळाच्या ठिकाणी पडताळणी, ‘बॉडी वॉर्न कॅमेरा’ असलेल्या चमूंद्वारे पडताळणी, मेळ्याच्या प्रवेशद्वारावर आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर विविध सुरक्षायंत्रणांकडून समन्वयातून तपासणी आणि पाण्याच्या खालून ड्रोनद्वारे (‘अंडरवॉटर ड्रोन’द्वारे) नद्यांतून लक्ष ठेवण्यात येत आहे.

महाकुंभमध्ये प्रशिक्षित घोड्यांवरून गस्त घालतांना उत्तरप्रदेशाचे पोलीस

येथे १३० हून अधिक प्रशिक्षित घोडे आणण्यात आले आहेत. त्यावर पोलीस कर्मचारी स्वार होऊन कुंभची सुरक्षा पहाणार आहेत. हे घोडे विदेशी आणि काही भारतीय सैन्यातील आहेत. विदेशी घोड्यांचे मूल्य ५० लाख रुपयांपासून १ कोटी रुपयांपर्यंत आहे. या घोड्यांच्या मानेत शस्त्रक्रिया करून एक चीप लावण्यात आली आहे, ज्यातून त्यांच्या गत ७ पिढ्यांची माहिती मुद्रित केली आहे. भाविकांना त्रास न देता कुंभक्षेत्री वावरण्यासाठी या घोड्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कुंभक्षेत्रातील विविध व्यवस्थांची व्याप्ती पुष्कळ मोठी आहे. या व्यवस्था करणे, हे काही सोपे काम नाही. त्यातही विविध समस्या, अडचणी यांचा सामना प्रशासनाला करावा लागतो. लोकांनाही काही भिन्न भिन्न अडचणी असतात. एकूणच यातून कुंभक्षेत्राचा काही आवाका लक्षात येऊ शकेल.

५. पांटून पूल

मागील वेळी गंगेच्या प्रवाहांवर १८ पांटून (पिंपा) पूल बनवले होते. या वेळी ही संख्या ३० आहे. पांटून पूल म्हणजे टँकरप्रमाणे मोठे जड लोखंडी; मात्र आतून रिकामे असे पांटून किंवा पिंप असतात, जे काही टन वजनाचे असतात, ते नदीच्या प्रवाहात विशिष्ट अंतरावर ठेवले जातात. त्यावर लोखंडी रुळाप्रमाणे लांब लोखंडी पट्या टाकल्या जातात, त्यावर पुन्हा लाकडी पट्ट्या आणि नंतर पुन्हा त्यावर लोखंडी मोठ्या वजनदार ‘चेकर्ड प्लेट’ (लोखंडी प्लेट) टाकून ते सर्व स्क्रू आणि नट-बोल्टने जोडले जातात. हे पूल एवढे दणकट असतात की, त्यावरून ते ५ टन वजन पेलू शकतात. हे अस्थायी पूल असतात; मात्र पुष्कळ भक्कम असतात. यावरून टॅक्ट्रर, तसेच छोटे ट्रक जाऊ शकतात. नदीचे पाणी वाढल्यास हे पिंप त्यामध्ये बुडत नाहीत.

६. रस्त्यांचे निर्मिती कार्य

कुंभमेळा गंगानदीच्या वालूकामय पात्रात होत असल्याने या वाळूवरून व्यक्तींना चालणे, तसेच वाहनांची वाहतूक पुष्कळ कठीण असते. त्यासाठी या वाळूंवर लोखंडी प्लेट टाकून त्यापासून रस्ते सिद्ध केले जातात. या वाळूवर जी लोखंडी प्लेट टाकतात, तिला ‘चेकर्ड प्लेट’ म्हणतात. कुंभनगरीत सर्वांत प्रथम या रस्त्यांची निर्मिती होते, जेणेकरून अन्य व्यवस्था उभारण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये. या वेळी ५५० किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते या चेकर्ड प्लेट टाकून सिद्ध करण्यात येतात. जगात एवढ्या लांबीचे लोखंडी रस्ते केवळ कुंभक्षेत्रीच पहाण्यास मिळतील. एक प्लेट लांबी, रूंदी यांच्या प्रमाणानुसार १०० ते २०० किलो वजनाची असते. या २ प्लेट एकमेकांना जोडण्यात येतात, जेणेकरून ते हलू नयेत आणि त्यावरून दुचाकी, चारचाकी आणि मोठे ट्रक सहज जाऊ शकतील. या रस्त्यांमुळेच कुंभक्षेत्री ये-जा करणे सुलभ होते.

७. सेक्टरची (विविध प्रभागांची) निर्मिती

कुंभमेळ्याचे क्षेत्र अनेक सेक्टरमध्ये विभागलेले असते. त्या सेक्टरना क्रमांक दिलेले असतात. गत कुंभमेळ्याच्या वेळी १४ सेक्टर होते, या वेळी २५ सेक्टर आहेत. या सेक्टरमध्ये आखाडे, संप्रदाय, आध्यात्मिक संस्था, अन्य धार्मिक संस्था यांच्यासाठीच्या जागांची विभागणी केलेली असते. या जागा आध्यात्मिक संस्थांना सरकार त्यांचे कार्य, व्याप्ती इत्यादी विविध निकषांनुसार दिल्या जातात. गत कुंभमेळ्यात किंवा प्रत्येक कुंभमेळ्याला संस्था किंवा संप्रदाय यांना या ठिकाणी, ज्या आकारात जागा दिलेल्या असतात, त्यात शक्यतो पालट होत नाही. त्यासाठी संस्था, संप्रदाय यांना सरकारकडे अर्जही करावा लागतो. काही अतिरिक्त जागा हवी असल्यास, तसे आवेदनही द्यावे लागते. त्यानंतर सरकार त्याविषयी ठरवून जागा उपलब्ध करून देते.

प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमाच्या जवळ उभारण्यात आलेली ‘टेंट सिटी’ (तंबूंचे नगर)

या जागांमध्ये प्रत्यक्ष रहाण्याची जागा ज्यांना ‘टेंट’ म्हणजे तंबू म्हणतात, ते असतात. प्रत्येक संप्रदाय, आखाडा, संस्था यांना सरकारकडून हे तंबू उभारून देण्यात येतात. जेवढी मोठी जागा, तेवढ्या मोठ्या आकाराचे हे तंबू असतात. मुख्य तंबू, संतांच्या तंबूमध्ये प्रवचनाची जागा, यज्ञशाळा, झोपण्यासाठी लहान आकाराचे तंबू, जेवण बनवण्याची खोली, सामानाची खोली, शौचालय आणि स्नानगृह अशी व्यवस्था केलेली असते. निवासाच्या तंबूंचेही अनेक प्रकार असतात. काही तंबू चौरस आकाराचे असतात, त्यावर घुमटाच्या आकाराचे वर निमुळते होणारे कापड आणि टारपोलीन घातलेले असते. पाऊस पडतो, तेव्हा याचा लाभ होतो. काही तंबू उलट्या ‘व्ही’ आकाराचे असतात. तंबूमध्ये अनेक प्रकार असतात. कुंभमेळ्याचे ड्रोन छायाचित्रकाने छायाचित्र पाहिल्यास वरून अधिकाधिक तंबू हे पिवळे, पांढरे, लाल आणि निळे कापड लावलेले छत दिसते. नदी किनारी रंगीबेरंगी छत असलेले हे तंबू आणि मधोमध वहाणारी गंगा नदी यांचे हे दृश्य सुंदर दिसते.

श्री. यज्ञेश सावंत

तंबूमध्ये सर्वांत खाली गंगेच्या भूमीवर (वाळूवर) सुकलेले गवत अंथरले जाते. त्यावर मेण कापड, पुन्हा गवत, त्यावर फोम आणि पुन्हा कापड अंथरलेले असते. त्यामुळे तंबूत थोडे उबदार वातावरण रहाते आणि एकूणच थंडीपासून रक्षण होते.

शौचालयांसाठी भूमीत शोष खड्डे सिद्ध केलेले असतात, त्यावर थोडे बांधकाम करून शौचालयांची भांडी जोडलेल्या प्लेट्स त्यावर बसवलेल्या असतात आणि त्याला सर्व बाजूंनी कापडी आडोसा केलेला असतो, त्याला दरवाजाची कडी म्हणून हूक लावलेला असतो. जे काही बांधकाम केले जाते, ते शक्यतो लाकूड आणि बांबू यांचे असते. काही बांधकामाचा आकार मोठा असल्यास ॲल्युमिनिअमच्या पट्या, शीट वापरून ते केले जाते.

सरकारकडून मूलभूत व्यवस्था केलेली असते, ती व्यवस्था आणखी चांगली करण्यासाठी स्वतः व्यय करून संबंधित संस्था, संप्रदाय करू शकतात, म्हणजे त्यांना सोयीचे पालट ते चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतात. असे असले, तरी मोठे संप्रदाय, आखाडे भव्य-दिव्य आयोजन आणि व्यवस्था करतात. त्यांच्या तंबूंच्या ठिकाणी कमानीसह भव्य प्रवेशद्वार असते आणि आतमध्ये व्यवस्था मोठी असते.

८. शौचालये आणि पाण्याची व्यवस्था

कुंभमेळ्यात दीड लाख शौचालये सिद्ध होत आहेत आणि त्यामध्ये ३०० हून अधिक फिरती शौचालये आहेत. घाटावर अनुमाने १० सहस्रांहून अधिक ‘चेंजिंग रूम’ (कपडे पालटण्यासाठीचे कक्ष) उभारण्यात येत आहेत. एकूण १२ कि.मी. लांबीचे घाट सिद्ध करण्यात आले आहेत.

कुंभक्षेत्रात पाणीपुरवठा करण्यासाठी भूमीखालून १ सहस्र २०० कि.मी. लांब जलवाहिन्यांचे जाळे सिद्ध करण्यात आले असून ५६ सहस्रांहून अधिक नळजोडण्या या संत, संप्रदाय, धार्मिक संस्था यांच्या तंबूंना देण्यात आल्या आहेत.

९. हरवलेल्या व्यक्तींसाठी १० शोध केंद्र

कुंभक्षेत्री मोठ्या संख्येने लोक येत असल्यामुळे व्यक्ती हरवण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे उच्च तंत्रज्ञानाने युक्त १० केंद्र सिद्ध करण्यात आली असून एखादी व्यक्ती हरवल्यास त्याचे छायाचित्र कुंभक्षेत्री प्रत्येक सेक्टर, चौक येथे लावलेल्या एल्.ई.डी. स्क्रीनवर दिसू शकणार आहे, त्यामुळे तिचा शोध घेणे सुलभ होऊ शकेल.

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, कुंभनगरी प्रयागराज, उत्तरप्रदेश. (७.१.२०२५)