पुणे – बालगंधर्व रंगमंदिर येथील कलादालनामध्ये ‘नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा’ यावर आधारित ६० फ्लेक्सचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले होते. ४ आणि ५ जानेवारी या दिवशी मिलिटरी कमांडर यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते. इतिहासतज्ञ, गड आणि दुर्ग संवर्धन प्रेमी, राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. या शौर्याचा राष्ट्र रक्षणासाठी मिलिटरी कमांडर्स कसा विचार करतात ? हा महत्त्वपूर्ण भाग सर्वांनी जाणून घेतला. तानाजी मालुसरेंच्या यशस्वी नेतृत्वाखाली नियोजनाचे महत्त्व, प्रत्यक्ष लढाईत पालटत्या परिस्थितीत त्यांनी कसे निर्णय घेतले ? या ऐतिहासिक लढाईतील अनेक नवे पैलू लक्षात आल्याचे मत प्रदर्शन राष्ट्रप्रेमी नागरिकांनी व्यक्त केले.
अनेकांनी ‘असे प्रदर्शन वारंवार वेगवेगळ्या भागात लावणे आवश्यक आहे. त्यामुळे तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेमी भावना निर्माण होईल’, असेही मत व्यक्त केले. या प्रदर्शनाला मिळालेल्या प्रतिसादाविषयी आयोजक विंग कमांडर शशिकांत ओक यांनी समाधान व्यक्त केले आहे. लष्करी बाजूने विचार करायला लावणारी प्रदर्शने शाळा, महाविद्यालयांमध्ये दाखवणे नितांत आवश्यक आहे, असेही मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले. २०० हून अधिक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी २ दिवसीय प्रदर्शनाचा लाभ घेतला.
या प्रदर्शनाला प्रा. नामदेवराव जाधव, ॲडमिरल नाडकर्णी, एअर मार्शल प्रदीप बापट, मेजर जनरल शिशिर महाजन, ‘नॅशनल बुक ट्रस्ट’चे विश्वस्त राजेश पांडे या मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनीही याचा लाभ घेतला. विंग कमांडर शशिकांत ओक यांनी कार्यकर्त्यांना फ्लेक्स प्रदर्शनाचा उद्देश सांगितला.