China’s Claim About Dam : (म्हणे) ‘ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधल्याने भारताची हानी होणार नाही !’ – चीनचा दावा

 भारताने घेतला होता आक्षेप !

बीजिंग (चीन) – तिबेटमधील यारलुंग त्सांगपो (ब्रह्मपुत्रा) नदीवर धरण बांधल्याने भारत किंवा बांगलादेशातून जाणशर्‍या नदीच्या पाण्याच्या प्रवाहावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट या प्रकल्पामुळे काही प्रमाणात आपत्ती टाळण्यास साहाय्य होणार आहे. चीनच्या या प्रकल्पामुळे सखल भागात हवामान पालट संतुलित होईल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ याकुन यांनी सांगितले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ३ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत या धरणाबाबत आक्षेप नोंदवला होता. ‘ब्रह्मपुत्रेवर धरण बांधल्याने भारतातील राज्यांची हानी होऊ शकते’, असे भारताने म्हटले होते.
या धरणावर चीन अंदाजे १३७ अब्ज अमेरिकी डॉलर (सुमारे १२ लाख कोटी रुपये) खर्च करणार आहे. चीनला येथून प्रतिवर्षी ३०० अब्ज किलोवॅट-तास वीज निर्मिती करायची आहे.


भारताची ईशान्येकडील राज्ये आधीच वारंवार पूर येण्याच्या समस्यांना तोंड देत आहेत. त्यांना हवामान पालटामुळे भूस्खलन, भूकंप आणि पूर इत्यादींसारख्या अधिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळेच या धरणाच्या बांधकामामुळे भारताची चिंता वाढली आहे.

संपादकीय भूमिका

विश्‍वासघातकी, धूर्त आणि भारतद्वेषी असणार्‍या चीनच्या या दाव्यावर कोण विश्‍वास ठेवणार ?