माझे वक्तव्य साईभक्तांच्या संदर्भात नसून ते येथे वाढलेल्या गुन्हेगारीच्या संदर्भात ! – डॉ. सुजय विखे-पाटील

माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी केलेल्या ‘देशातील भिकारी शिर्डी येथे येऊन जेवतात’, या विधानाचे प्रकरण

डॉ. सुजय विखे-पाटील

शिर्डी – शिर्डीतील प्रसादालयात विनामूल्य भोजन करणार्‍यांच्या संदर्भात मी जे वक्तव्य केले, त्यात काहीही चूक नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. शिर्डी येथे येणार्‍या भक्तांमध्ये आम्ही ‘साईबाबा’च पहातो. साईभक्तांविषयी आमच्या मनात काही नाही. जे लोक बाहेरून येऊन विनामूल्य भिक्षा घेऊन गुन्हेगारीचे प्रमाण वाढवतात, त्यांच्याविषयी मी बोललो आहे. या गुन्हेगारांमुळे जर शिर्डीतील एखाद्या मुलीवर अत्याचार झाला, तर त्याचे दायित्व कोण घेणार ? ‘शिर्डीचा पालक’ या नात्याने मी माझे मत मांडले आहे. प्रतिदिन सकाळी ८ वाजता गाड्या भरून भिकार्‍यांना येथे आणले जाते. ते प्रसादालयात जेवतात आणि रात्री मद्यपान करून रात्रीचा महाप्रसाद घेण्यासाठी पुन्हा प्रसादालयात जातात. हे आपण कसे सहन करू शकतो ? त्यामुळे माझे वक्तव्य साईभक्तांच्या संदर्भात नसून ते येथे वाढलेल्या गुन्हेगारीच्या संदर्भात होते, असे मत भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी मांडले. ते शिर्डी येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

डॉ. विखे-पाटील पुढे म्हणाले, ‘‘मी देवस्थानाला विनंती केली आहे की, त्यांनी अन्नदानाची देणगी-दान स्वतंत्र न घेता ते सर्व एकत्र करावे. जेणेकरून त्याचा व्यय जिथे हवा, तिथे करता येईल. शिर्डीतील शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे, येथील युवकांना चांगला रोजगार मिळाला पाहिजे, असे माझे मत आहे. येणार्‍या ३ महिन्यांत मी शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढणार आहे. ‘शिर्डी चांगली व्हावी’, हे माझे स्वप्न आहे.’’

डॉ. सुजय विखे यांचा साईभक्तांचा अनादर करण्याचा उद्देश नव्हता ! – संजय शिरसाट, सामाजिक न्यायमंत्री

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

डॉ. विखे-पाटील यांनी केलेल्या ‘भिकारीमुक्त साई देवस्थान आणि विनामूल्य भोजन व्यवस्था बंद करा’, वक्तव्याचा मी शिर्डी दौर्‍यावर असतांना पूर्ण अर्थ समजून घेतला. मला वस्तूस्थिती ठाऊक नव्हती. त्यामुळे मी त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला. विविध भागांतून शिर्डीत बसने किंवा ट्रकने ‘नशा’ करणारे येतात. त्यांना पायबंद घालावा, असा त्यांच्या वक्तव्यामागील उद्देश होता. त्यांना साईभक्तांचा अनादर करायचा नव्हता. शिर्डी देवस्थानाचे प्रसादालय आहे, ते तसेच चालू राहील आणि तिथे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.