ओटावा (कॅनडा) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो येत्या काही दिवसांत त्यांच्या पदाचे त्यागपत्र देऊ शकतात, असे वृत्त ‘ग्लोब अँड मेल’ या कॅनडाच्या वृत्तपत्राने दिले आहे. ट्रुडो यांच्यावर त्यांच्या लिबरल पक्षाच्या खासदारांकडून अनेक महिन्यांपासून त्यागपत्र देण्यासाठी दबाव आहे. कॅनडामध्ये ऑक्टोबरपूर्वी संसदीय निवडणुका होणार आहेत; मात्र ट्रुडो यांनी त्यागपत्र दिल्यावर या निवडणुका त्यापूर्वी घेतल्या जाऊ शकतील. देशात झालेल्या अनेक सर्वेक्षणांनुसार कॅनडामध्ये निवडणुका झाल्या, तर कंझर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमत मिळू शकते; कारण वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केलेल्या ‘इप्सॉस’ सर्वेक्षणात केवळ २८ टक्के नागरिकांनी ट्रुडो यांनी पुन्हा निवडणूक लढवावी, असे सांगितले. ट्रुडो यांना नापसंत करणार्या लोकांची संख्या ६५ टक्क्यांवर पोचली आहे.
ट्रुडो यांच्या पक्षाकडे बहुमत नाही
कॅनडाच्या संसदेत ३३८ जागा आहेत. यामध्ये बहुमताचा आकडा १७० आहे. ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाचे १५३ खासदार आहेत. गेल्या वर्षी ट्रुडो सरकारचा मित्रपक्ष असलेल्या खलिस्तान समर्थक न्यू डेमोक्रॅटिक पार्टीने त्याच्या २५ खासदारांचा पाठिंबा काढून घेतला होता. यामुळे ट्रुडो सरकार अल्पमतात आले. बहुमत चाचणीत ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाला दुसर्या पक्षाचा पाठिंबा मिळाला. यामुळे ट्रुडो यांचे सरकार टिकले.