HMPV In India : देशात ‘एच्.एम्.पी.व्ही.’ विषाणूचे ३ रुग्ण आढळले

चीनमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे या विषाणूचा संसर्ग

बेंगळुरू (कर्नाटक) : चीनमध्ये मोठ्या प्रमाणात ‘ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस’ (एच्.एम्.पी.व्ही.) नावाचा विषाणूचा संसर्ग होत आहे. आता भारतात या विषाणूने बाधित झालेले ३ रुग्ण आढले आहेत. बेंगळुरू येथे ३ आणि ८ महिन्यांच्या बाळांना याची लागण झाली आहे. येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहेत. या बाळाने कुठलाही प्रवास केलेला नाही. तसेच गुजरातच्या कर्णावती येथे २ महिन्याच्या बाळालाही याची लागण झाली आहे. त्याच्यावरही उपचार चालू आहेत.

चीनमध्ये या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला काही दिवसांपूर्वीच ‘अशा प्रकारच्या विषाणूला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत’ असे म्हटले होते. तसेच आरोग्य मंत्रालयाने बैठक बोलावली होती.

‘एच्.एम्.पी.व्ही.’ची लक्षणे काय आहेत ?

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस सामान्य सर्दी आणि कोरोना विषाणूसारखी लक्षणे दर्शवतो. त्यामध्ये खोकला, ताप यांचाही समावेश आहे. या विषाणूचा संसर्ग चीनच्या अनेक भागांमध्ये वाढत आहे. यामुळे सरकारी अधिकारी लोकांना मुखपट्टी (मास्क) घालणे आणि वारंवार हात धुणे यांसारखी खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहेत.

‘एच्.एम्.पी.व्ही.’ काय आहे ?

‘एच्.एम्.पी.व्ही.’चा वर्ष २००१ मध्ये डच संशोधकांनी सर्वांत पहिल्यांदा शोध लावला होता. हा विषाणू श्‍वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो. हा विषाणू किमान ६० वर्षांपासून प्रसारित होत आहे आणि आता जागतिक स्तरावर प्रचलित श्‍वसन रोगजनक म्हणून ओळखला जातो. ‘एच्.एम्.पी.व्ही.’ प्रामुख्याने खोकतांना आणि शिंकतांना बाहेर पडणार्‍या  वसनाच्या थेंबांद्वारे पसरतो. संक्रमित व्यक्तींच्या जवळच्या संपर्कातून किंवा दूषित वातावरणाच्या संपर्कातूनही या विषाणूचे संक्रमण होऊ शकते. या संसर्ग कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो. हा विषाणू हिवाळा आणि वसंत ऋतूच्या महिन्यांत अधिक प्रमाणात आढळतो.

या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना –

‘एच्.एम्.पीव्.ही.’ धोकादायक नाही ! – इंडियन मेडिकल असोसिएशनचे (महाराष्ट्र) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे

इंडियन मेडिकल असोसिएशनचे (महाराष्ट्र) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केले की, वर्ष २०२५ मध्ये चीनमध्ये ‘एच्.एम्.पी.व्ही.’ विषाणू पसरलेला आहे; परंतु हा फारसा नवीन नाही. याची साथ काही काळापूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतही आली होती. हा विषाणू कोरोनासारखाच असला, तरी कोरोनाच्या गटातील नाही. या आजाराचा लोकांना जो काही त्रास होतो, तो कोरोनापेक्षा अल्प आहे. तसेच, या विषाणूमुळे होणार्‍या मृत्यंचे प्रमाणही पुष्कळ अल्प आहे. याची बाधा झाल्यानतंर संबंधीत व्यक्तीला नाकातून पाणी वहाणे, शिंका येणे, खोकला येणे, घसा खवखवणे, ताप येणे, तसेच, हा आजार वाढला तर न्युमोनिया होण्यासारखी लक्षणे दिसून येतात. ऑक्सिजनची पातळीसुद्धा अल्प होऊ शकते; मात्र तो धोकादायक नाही. साधारणता ५ ते १० दिवसांत हा आजार पूर्णपणे बरा होतो. विश्रांती आणि इतर काही तापाची औषधे घेतल्यास हा आजार बरा होतो.