कुंभमेळा ‘वक्फ बोर्डा’च्या भूमीवर असल्याचा दावा हा सनातनी लोकांच्या श्रद्धेला धक्का देण्याचा प्रयत्न ! – हिंदु जनजागृती समिती

मौलाना बरेलवी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी !

पत्रकार परिषदेला संबोधित करतांना डावीकडून श्री. चेतन राजहंस आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ‘वक्फ’ संकल्पनेचा जन्म होण्याच्या लाखो वर्षांपूर्वी, म्हणजे सत्ययुगापासून गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर कुंभमेळ्याचे आयोजन केले जात आहे. जगातील सर्वांत जुनी तीर्थयात्रा असलेल्या कुंभमेळ्यावर वक्फ बोर्डाने केलेल्या अतिक्रमणाच्या दाव्याला हिंदु जनजागृती समितीचा तीव्र विरोध आहे. प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर ‘सनातन काळा’पासून आयोजित करण्यात आलेल्या या महाकुंभावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करणे अशोभनीय आहे, अशी रोखठोक भूमिका हिंदु जनजागृती समितीने घेतली आहे. महाकुंभक्षेत्री, म्हणजेच प्रयागराज येथे समितीच्या वतीने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेला समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, तसेच सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी संबोधित केले.

सद्गुरु डॉ. पिंगळे पुढे म्हणाले की,

१. कुंभमेळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सनातन संस्कृतीचे प्रतीक आहे. हिंदु धर्मात मातेप्रमाणे पूजनीय असलेल्या गंगा नदीच्या कुशीत मेळ्याचे आयोजन केले जाते. गंगानदीची पवित्र भूमी कोणत्याही विशिष्ट समुदायाची असू शकत नाही.

२. कुंभमेळ्याच्या ठिकाणी असलेल्या ५४ बिघा भूमीवर अलीकडेच मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी वक्फचा दावा केला. हा दावा केवळ निराधार नसून कुंभमेळ्याचे पवित्र वातावरण बिघडवण्याचा आणि सनातन धर्माच्या अनुयायांच्या श्रद्धेला धक्का पोचवण्याचा सुनियोजित प्रयत्न आहे.

३. आपल्या देशात अशी अनेक मंदिरे आहेत, ज्यांवर मशिदींनी अतिक्रमण केले आहे. आम्ही मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांना विचारू इच्छितो की, ते अतिक्रमण केलेली मंदिरे परत मिळवून देण्याचा मोठेपणा दाखवू शकतात का ?

४. कुंभमेळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलावीत, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती करते. मौलाना यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्यांचा निराधार दावा फेटाळण्यात यावा.


हे वाचा → Maulana Shahabuddin Razvi Controversial Statement : महाकुंभ मेळ्याच्या भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा !


५. कुंभमेळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचा निर्धार आहे. आम्ही हिंदु समाजाला या सूत्रावर संघटित होऊन सरकारवर कारवाई करण्यास दबाव आणण्याचे आवाहन करतो.