१४.३.२०२३ या दिवशी पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक (वय ४२ वर्षे) सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संतपदी विराजमान झाल्याचे सद्गुरु स्वाती खाडये यांनी घोषित केले. त्या सोहळ्यात आरंभी सद्गुरु स्वाती खाडये यांनी सौ. मनीषा पाठक यांचा साधनाप्रवास जाणून घेण्यासाठी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या काही भाग १.१.२०२५ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहू.
(भाग ३)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/868954.html
६. अनिष्ट शक्तींचे झालेले त्रास आणि त्यांवर गुरुकृपेने केलेली मात !
६ ई. वाईट शक्तींनी निर्माण केलेल्या जीवघेण्या प्रसंगांत गुरुकृपेने रक्षण होणे
सद्गुरु स्वाती खाडये : आध्यात्मिक त्रास होत असतांना तुम्ही अनेक ठिकाणी सत्संग घ्यायला दुचाकीवरून जात होत्या. तेव्हा तुम्ही कशी श्रद्धा ठेवली ? अनेक वेळा तुम्ही गाडी चालवत असतांना तुम्हाला त्रास होत असायचा. अशा प्रसंगांत गुरुदेवांनी तुम्हाला कसे सांभाळले ?
६ ई १. दुचाकीवरून जातांना वाईट शक्तीने महामार्गाच्या दिशेने दूरवर नेणे आणि काही वेळाने भानावर येणे
सौ. मनीषा पाठक : एकदा मी माझी मुलगी कु. प्रार्थना हिला घेऊन सत्संगाला जात होते. तेव्हा प्रार्थना ४ मासांची होती. मी तिला ‘कांगारू बॅग’मध्ये (टीप) ठेवले होते. मी तिला पाळणाघरात ठेवून सत्संगाला जायचे. तिला पाळणाघरात ठेवण्यासाठी महामार्गाच्या दिशेने जावे लागायचे; पण मला त्रास देणारी वाईट शक्ती मला मुंबई-पुणे महामार्गावर पाळणाघर असलेल्या ठिकाणाच्या पुढे घेऊन गेली. मी गाडीही वेगाने चालवायचे. माझ्या काही लक्षात येत नव्हते. महामार्गावर गेल्यानंतर कु. प्रार्थना तोंडातून विचित्र आवाज काढत होती. नंतर थोड्या वेळाने मी भानावर आले. मला सत्संगासाठी मुकुंदनगरला जायचे होते. त्यामुळे मला विरुद्ध दिशेने (राँग साईडने) गाडी ढकलत आणावी लागली. तेव्हा प्रार्थना माझ्या गळ्यात असलेल्या पिशवीत होती. अशा प्रसंगांमध्ये ‘परात्पर गुरु डॉक्टर स्थुलातून जवळ आहेत’, असे मला जाणवायचे.
टीप १ – कांगारू बॅग : बाळाला घेऊन दुचाकीवरून जातांना या विशिष्ट आकाराच्या पिशवीत बाळ ठेवतात.
६ ई २. गॅसगळतीमुळे स्वयंपाकघरात जाळ पसरलेला असतांना मी घरात कोंडली जाणे, दाराची कडी आपोआप निघणे आणि गुरुकृपेनेच प्राण वाचणे
सौ. मनीषा पाठक : एकदा घराची सर्व दारे अन् खिडक्या बंद असतांना मी स्वयंपाकघरातील गॅस चालू केला. गॅसगळती झालेली असल्यामुळे गॅसचा जाळ सगळीकडे पसरला. यजमान कार्यालयातून घरी आले नव्हते. आत माझा जीव गुदमरला. शेजारच्या सदनिकेमध्ये गॅसचा वास गेला. नंतर शेजारची माणसे आली; पण त्रासामुळे मला दार उघडता येत नव्हते आणि मला ऐकूही येत नव्हते. शेजार्यांनी जोरजोराने दार वाजवले आणि शेवटी ‘आतली कडी कशी निघाली ?’, हे ठाऊक नाही. ‘ती गुरुदेवांनीच उघडली’, असे मला जाणवले.
संकुलातील लोक जमा झाले. त्यांनी घराच्या दारे आणि खिडक्या उघडल्या अन् मला घरातून बाहेर आणले. त्या वेळी ‘मला त्रास देणार्या वाईट शक्तीचा मला संपवण्याचा विचार होता’, असे मला जाणवले.
सद्गुरु स्वाती खाडये : या प्रसंगात अनिष्ट शक्तींनी तुम्हाला ठार मारण्याचाच प्रयत्न केला होता; पण ‘परात्पर गुरु डॉक्टर जवळ आहेत’, अशी तुमची श्रद्धा होती. ते सूक्ष्मातून तुमच्या जवळ होते आणि त्यांनीच ती कडी उघडली, असेच होते ना ?
सौ. मनीषा पाठक : हो सद्गुरु ताई.
६ ई ३. डावा पाय अधू झालेला असतांना कुणीतरी ढकलल्यासारखे वाटून डोक्यावर पडणे आणि डोक्याला मार लागणे
सौ. मनीषा पाठक : वर्ष २०१६ पासून मला डाव्या गुडघ्याचा त्रास चालू झाला होता. अकस्मात् माझा डावा गुडघा लाल होऊन दुखायला लागला. मला तीव्र वेदना होत होत्या. दुसर्या दिवशी पुष्कळ ताप आल्यामुळे मला रुग्णालयात भरती करावे लागले. तेव्हा आधुनिक वैद्यांनी ‘चिकनगुनिया, डेंग्यू’ असे निदान केले होते. तेव्हापासून माझा डावा पाय अधू झाला आहे. नंतर मी वर्षभर झोपूनच होते. त्यानंतर मी ‘वॉकर’ (टीप २) आणि काठी घेऊन चालायचा प्रयत्न करत होते. एकदा मी आधारासाठी हातात काहीच न घेता चालायचा प्रयत्न केला. त्या वेळी मला कुणीतरी ढकलल्यासारखे वाटले आणि मी डोक्यावर पडले. त्यामुळे माझ्या डोक्याच्या मागच्या बाजूला मेंदूच्या जवळ जखम झाली. तेव्हा पुष्कळ रक्तस्त्राव झाला. मला उलट्याही झाल्या. नंतर साधकांनी मला आधुनिक वैद्यांकडे नेले.
टीप २ – वॉकर : आधार घेऊन चालायचे एक साधन.
सद्गुरु स्वाती खाडये : म्हणजे प्रत्येक वेळी वाईट शक्तींनी तुम्हाला मारण्याचाच प्रयत्न केला होता; पण तुमची दृढ श्रद्धा आणि भाव यांमुळे गुरुदेव सतत तुमच्या जवळ राहिले अन् त्यांनी तुमचे रक्षण केले. बरोबर ना ?
सौ. मनीषा पाठक : हो.
६ ई ४. कुणीतरी पाठीच्या हाडांना दोरी बांधून आवळल्याचे जाणवून हालचाल करता न येणे आणि आधुनिक वैद्यांनी ‘अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस’, हा आजार झाल्याचे सांगणे
सौ. मनीषा पाठक : नोव्हेंबर २०१९ मध्ये आम्ही पूर्णवेळ साधना करू लागलो. मी पुण्याला सेवाकेंद्रात रहात होते. तेव्हा मी हस्तप्रक्षालन पात्रासमोर (बेसिनसमोर) उभी होते. अकस्मात् ‘कुणीतरी माझी पाठ आवळली आहे आणि माझी सगळी हाडे कुणीतरी दोरी बांधून आवळली आहेत’, असे मला जाणवले.
मी धडधाकट दिसत होते; पण मला हलताच येत नव्हते. माझे शरीर लाकडासारखे कडक झाले होते. मला रुग्णालयात नेले. तेव्हा आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘यांचा पाठीचा मणका नागमोडी झालेला आहे. याला ‘अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस (Ankylosing spondylitis)’ असे म्हणतात.’’ तेव्हापासून मी पुष्कळ रुग्णाईत झाले.
६ उ. त्रास होऊनही ‘गुरुदेवांचे चरण सोडायचे नाहीत’, या दृढ निश्चयामुळे गुरुदेवांवरील श्रद्धा न ढळणे
सद्गुरु स्वाती खाडये : तुमच्या त्रासांची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली होती, तरी तुमची श्रद्धा दृढ होती. ‘आपण साधनेतून बाहेर पडूया. आपल्याला त्रास होत आहेत. आपण काही करू शकणार नाही’, असे तुमच्या मनात कधी आले नसावे’, असे मला वाटते.
सौ. मनीषा पाठक : कधीच आले नाही.
सद्गुरु स्वाती खाडये : हे कसे शक्य झाले ?
सौ. मनीषा पाठक : लहानपणापासूनच मला शबरीसारखी भक्ती करायची होती. संत मीराबाई आणि शबरी या दोघी जणी मला फार आवडतात.
सद्गुरु स्वाती खाडये : तुमच्याकडे बघून मला शबरीच आठवली.
सौ. मनीषा पाठक : ‘मला काहीही झाले, तरी गुरुदेवांचे चरण सोडायचे नाहीत’, असा माझा विचार असायचा.
६ ऊ. वाईट शक्तींचा त्रास होत असतांना यजमानांनी (श्री. महेश पाठक यांनी) सर्वतोपरी साहाय्य करणे
सौ. मनीषा पाठक : मला वाईट शक्तींचा त्रास होत असतांना माझ्या यजमानांनी (श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४३ वर्षे) यांनी)) मला साथ दिली. ‘तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली पत्नी मिळणे’, हे त्यांचे कठीण प्रारब्ध होते’, असे मला वाटते.
सद्गुरु स्वाती खाडये : महेशदादाही उच्चशिक्षित (Master in Computer Science) आहेत ना ?
सौ. मनीषा पाठक : हो. त्यांनी मला त्रासांसहित स्वीकारले; पण मी त्यांच्यासाठी काही करू शकत नसे. महेश यांनी मला भावनिक स्तरावर ‘पत्नी’ म्हणून हाताळले नाही. ‘तू रुग्णाईत आहेस, तर तू सेवा करू नकोस किंवा तू आधी घराकडे लक्ष दे’, असे ते मला कधीच म्हणाले नाहीत. आजपर्यंत आम्ही कुठे फिरायलाही गेलो नाही.
६ ऊ १. निर्मळ मन, अल्प अहं आणि सेवाभाव असणारे श्री. महेश पाठक !
सद्गुरु स्वाती खाडये : ताई, महेशदादाही साधनेत होते का ?
सौ. मनीषा पाठक : ते प्रथम एवढे साधनेत नव्हते. त्यांना संस्था ठाऊक होती; पण नंतर ते साधना करू लागले आणि त्यांच्यामुळे माझी श्रद्धा दृढ होत गेली. ते मला सांगायचे, ‘‘तुझा जन्म केवळ गुरुदेवांच्या सेवेसाठी झाला आहे.’’
सद्गुरु स्वाती खाडये : म्हणजे तुमचा विवाह झाला, त्या वेळी महेशदादा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत नव्हते, तरी त्यांची वृत्ती धार्मिक होती आणि त्यांच्यामध्ये उपजतच गुण होते. त्यामुळे त्यांनी तुम्हाला साहाय्य केले.
सौ. मनीषा पाठक : ते सिंहगड रस्त्याला रहायचे. सिंहगड रस्त्याला श्री. महेंद्र अहिरेदादा त्यांना साधनेविषयी मार्गदर्शन करायचे आणि त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवाही द्यायचे. महेश यांची आध्यात्मिक प्रगती माझ्या आधी झाली !
(‘सौ. मनीषा पाठक यांच्या आधी श्री. महेश पाठक यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले.’ – संकलक)
सौ. मनीषा पाठक : त्यांच्यात अहं अल्प आहे. त्यांचे मन लहान मुलासारखे निर्मळ आहे. त्यांच्या मनात कुणाविषयी कधीच काही प्रतिक्रिया नसते. कितीही कटू प्रसंग घडू दे, कुणी त्यांचा अपमान करू दे; पण ते नेहमीच आनंदी असतात. त्यांना मायेतील आकर्षण नव्हते; कारण त्यांचेही बालपण कष्टातच गेले होते. आमच्या घरी सत्संग असायचा. सत्संगातील वातावरण कधी गंभीर असायचे. तेव्हा ते म्हणायचे, ‘‘तुम्ही साधना करता, मग एवढे गंभीर कसे असता ? तुम्ही आनंदी असले पाहिजे.’’ ते सत्संगाला बसत नसत.
ते सत्संगाची सिद्धता करायचे. ‘झाडणे, सतरंजी घालणे, सगळ्यांसाठी चहा बनवणे, सत्संगानंतर सर्व आवरून ठेवणे’, हे सगळे करायचे; पण सत्संग चालू झाला की, ते लहान मुलांच्या समवेत क्रिकेट खेळायला जायचे. ते म्हणायचे, ‘‘मी इथे थांबणार नाही.’’ त्या वेळी ‘त्यांना कसे सांगायचे ?’, हे मला कळत नव्हते.
सद्गुरु स्वाती खाडये : म्हणजे एकप्रकारे त्यांची आतून साधना चालू होती.
सौ. मनीषा पाठक : याआधी त्यांना एक अनुभूती आली होती. त्यांना कुणीतरी सांगितले, ‘‘देवदला पूर आला आहे. तेथील आश्रमात साहाय्याला जा.’’ तेव्हा ते देवद आश्रमात सेवेला गेले होते. त्या वेळी त्यांनी चिखल काढला, तरी त्यांना काही त्रास झाला नाही.
त्यांनी सेवेला आरंभ केला, तेव्हा त्यांना श्री. कृष्णाजी पाटीलकाका (आताची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६८ वर्षे) आणि श्री. भालचंद्र जोशीकाका (आताची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७२ वर्षे) यांचा सत्संग मिळाला. महेश कुठल्याच सेवेला ‘नाही’ म्हणत नसत. त्यांना सेवेतील आनंद मिळत गेला.
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये : अशा प्रकारे त्यांच्या साधनेचा आरंभ झाला.’
(पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांच्या संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी सद्गुरु स्वाती खाडये यांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीतील संकलित भाग) (१४.३.२०२३)
(‘ही मुलाखत पू (सौ.) मनीषा पाठक यांना संत म्हणून घोषित करण्यापूर्वीची असल्याने त्यांच्या नावाच्या आधी ‘पूज्य’ लावलेले नाही.’ – संकलक)
(क्रमशः)
या लेखातील भाग ४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/869646.html
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |