सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी सनातनच्‍या १२३ व्‍या (समष्‍टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४२ वर्षे) यांची मुलाखत घेऊन त्‍यांच्‍या साधनाप्रवासाचे उलगडलेले विविध पैलू !

१४.३.२०२३ या दिवशी पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक (वय ४२ वर्षे) सनातनच्‍या १२३ व्‍या (समष्‍टी) संतपदी विराजमान झाल्‍याचे सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी घोषित केले. त्‍या सोहळ्‍यात आरंभी सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी सौ. मनीषा पाठक यांचा साधनाप्रवास जाणून घेण्‍यासाठी त्‍यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्‍या काही भाग १.१.२०२५ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहू.

(भाग ४) 

या लेखातील भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/869231.html 

सद्गुरु स्वाती खाडये

७. मुलीचा जन्‍म आणि त्‍या माध्‍यमातून केलेली साधना ! 

७ अ. ‘गर्भावर साधनेचे संस्‍कार व्‍हावेत आणि स्‍वतःच्‍या आध्‍यात्मिक त्रासाचा बाळाला त्रास होऊ नये’, यासाठी ९ मास आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करणे 

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : तुमची मुलगी कु. प्रार्थना (कु. प्रार्थना पाठक, आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय १३ वर्षे) दैवी बालिका आहे. तुम्‍ही तिच्‍यावर एवढे चांगले संस्‍कार कसे केलेत ? तुम्‍ही काय भाव ठेवलात ?

सौ. मनीषा पाठक : सद़्‍गुरु ताई, गुरुदेवांनीच माझ्‍याकडून प्रयत्न करून घेतले. माझ्‍यामध्‍ये स्‍वभावदोष आणि अहं यांचे पैलूही होते; पण माझ्‍या मनात ‘मला सेवा करायची आहे’, हा विचार असायचा. माझा विवाह झाल्‍यानंतर सहाव्‍या दिवशीच मी सेवेला गेले. मी महेश यांना सांगितले होते, ‘‘मी विवाह करत आहे; पण ‘सेवा’ हेच माझे प्राधान्‍य असणार.’’ त्‍यांनीही मला पुष्‍कळ साथ दिली. अपत्‍याचा विचार करतांनाही आमच्‍याकडून साधनेच्‍या दृष्‍टीनेच सगळे प्रयत्न झाले. नंतर प्रार्थनाचा जन्‍म झाला. प्रार्थनाच्‍या जन्‍माच्‍या आधी ९ मास मला पुष्‍कळ आध्‍यात्‍मिक त्रास झाले; पण तेव्‍हा ‘गर्भावर साधनेचे संस्‍कार व्‍हावेत. आपल्‍या त्रासाचा बाळाला त्रास होऊ नये’, असे मला वाटायचे. तेव्‍हा मी खोक्‍यांचे उपाय करून ७ – ८ घंटे नामजप करायचे. तेव्‍हा मला दत्तगुरूंचा नामजप करायला सांगितला होता. त्‍या वेळी मला आध्‍यात्मिक स्‍तरावरील एकूण १५ उपाय करायला सांगितले होते. घरात उपायांची सारणी लावलेली असायची. ‘८ घंटे दत्तगुरूंचा नामजप करणे, पेल्‍यात पाणी घेऊन जप करणे आणि नंतर ते पाणी पिणे, दत्तगुरूंचा नामजप करत घरामध्‍ये तीर्थ शिंपडणे, पूर्वजांना अन्‍नाचा घास ठेवणे, पोटावर दत्तगुरूंचे चित्र लावणे, स्‍वतःभोवती दत्तगुरूंच्‍या नामपट्ट्या ठेवणे, घरात २४ घंटे दत्तगुरूंचा नामजप लावून ठेवणे’, असे अनेक उपाय होते अन् ते सलग नऊ मास करावे लागले.

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : तुम्‍ही हे सगळे न कंटाळता केले ?

सौ. मनीषा पाठक : गुरुदेवांनीच माझ्‍याकडून ते सगळे उपाय करून घेतले.

७ आ. ‘मूल होणे’, हा साधनेतील अडथळा नसून ती एक संधी आहे’, या विचाराने मुलीच्‍या जन्‍मानंतरही साधनेचे प्रयत्न चालू ठेवणे 

पू. (सौ.) मनीषा पाठक

सौ. मनीषा पाठक : ‘मूल झाल्‍यावर सेवा अल्‍प होते’, असा काही साधिकांचा अनुभव होता.  जेव्‍हा प्रार्थनाचा जन्‍म झाला, तेव्‍हा मी ठरवले होते, ‘बाळाच्‍या जन्‍मानंतरही आपण पुष्‍कळ सेवा करायची. ‘मूल होणे’, हा साधनेतला अडथळा नव्‍हे, तर ती एक संधी आहे.’

मी बाळंतपणासाठी नांदेडला आईकडे गेले होते. शस्‍त्रकर्म होऊन बाळाचा जन्‍म झाला. त्‍याच दिवशी माझा व्‍यष्‍टी साधनेचा आढावा होता. मी शुद्धीवर आले आणि लगेच सौ. ज्‍योती दातेकाकूंना (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के) माझ्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा पाठवला. तेव्‍हा मला वाटले, ‘गुरुदेवांनी मला ९ मास सांभाळले आहे. त्‍यांच्‍या कृपेने बाळाचा जन्‍म झाला आहे. आज मी आढावा दिला नाही, तर तो कृतघ्‍नपणा होईल. मी व्‍यष्‍टी साधना केली, तरच बाळाचीही साधना होऊ शकेल.’ मी ‘व्‍यष्‍टी साधनेचा आढावा देणे, प्रार्थनाला घेऊन नामजप करणे, भजने लावणे आणि सेवा करणे’, असे प्रयत्न चालू केले.

७ इ. गुरुकृपेने मुलीसाठी साधिका चालवत असलेले पाळणाघर मिळणे : प्रार्थना ३ मासांची झाली. तेव्‍हा आम्‍ही पुण्‍यात आलो. आम्‍ही दोघेही ‘सॉफ्‍टवेअर इंजिनीयर’ आहोत आणि दोघेही नोकरी करायचो. प्रार्थनाच्‍या जन्‍मानंतर मी नोकरी सोडली आणि महेश एकटेच नोकरी करायचे. मी प्रार्थनाला घेऊन सेवा करायचे. आम्‍हाला आर्थिक अडचणीही होत्‍या; पण त्‍या कालावधीतही माझ्‍या मनात ‘गुरुदेव आहेत’, हाच भाव होता. आम्‍ही प्रार्थनाला पाळणाघरामध्‍ये ठेवले. सौ. मुळेकाकू सनातनच्‍या साधिकाच आहेत. प्रार्थना ३ मासांची असल्‍यापासून त्‍यांच्‍या पाळणाघरात रहायची. ३ मासांचे बाळ आईच्‍या अंगावरील दूध पिते. प्रथम मी प्रत्‍येक २ घंट्यांनी पाळणाघरात जाऊन तिला दूध पाजायचे आणि पुन्‍हा सेवेला जायचे. मुळेकाकूंचे घर सात्त्विक होते. त्‍यामुळे हळूहळू प्रार्थनाला पाळणाघरात रहाणे आवडू लागले.

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : तुम्‍ही ‘बाळावर चांगले संस्‍कार झाले पाहिजेत’, असा विचार केला आणि गुरुदेवांच्‍या कृपेने प्रार्थनासाठी साधकांचेच पाळणाघर मिळाले. मुलीला घेऊन सेवेला जाऊ लागल्‍यावर तिच्‍या मनात साधकांविषयी कुटुंबभावना निर्माण होणे

सौ. मनीषा पाठक : नंतर मी प्रार्थनाला घेऊन सेवेला जाऊ लागले. त्‍यामुळे तिची साधकांशी जवळीक होऊ लागली. ‘केवळ आई-बाबा हेच आपले कुटुंब नसून ‘सनातनचे सगळे साधक’, हे माझे कुटुंब आहे’, असे तिला लहानपणासूनच वाटू लागले.

८. पूर्णवेळ साधना करण्‍याचा निर्णय घेणे 

८ अ. सौ. मनीषा यांनी पूर्णवेळ साधनेसाठी उच्‍च पदावरील नोकरी सोडणे 

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : तुम्‍ही नोकरी करता करता साधनाही करत होता. ‘आणखी चांगली साधना करता यावी’, यासाठी तुम्‍ही नोकरी सोडली. खरेतर तुम्‍ही उच्‍चशिक्षित (Master in Computer Management) आहात. तुमची नोकरीही चांगली होती. तुम्‍हाला ‘नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करावी’, असे कसे वाटले ? आजकाल कुणाला हेे जमत नाही.

सौ. मनीषा पाठक : मला नोकरी करायचीच नव्‍हती. परिस्‍थितीमुळे आणि माझ्‍या दोन बहिणींचे दायित्‍व माझ्‍यावर असल्‍यामुळे मला नोकरी करावी लागली.

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : त्‍या वेळी तुम्‍ही परिस्‍थितीनुसार नोकरी केली; पण लग्‍नानंतर तुम्‍ही उच्‍च पदावर असतांनाही ‘साधना करता यावी’, यासाठी नोकरी सोडली. हे कसे शक्‍य झाले ?

सौ. मनीषा पाठक : मी १० वर्षे ‘सॉफ्‍टवेअर इंजिनीयर’ म्‍हणून नोकरी केली. गुरुदेवांच्‍या कृपेने ‘नोकरी मिळवणे किंवा नोकरीमध्‍ये पदोन्‍नती मिळणे’, यांत कधी अडथळे आले नाहीत. मी सेवा करायचे, तेव्‍हा कुणीतरी येऊन मला साहाय्‍य करायचे. नोकरीच्‍या ठिकाणी माझे वेतनही वाढत होते आणि पदोन्‍नतीही होत होती. त्‍यामुळे मी नोकरी सोडल्‍यावर सगळे जण मला ‘वेडी’ म्‍हणू लागले. तेव्‍हा माझ्‍या मनात ‘मला सेवाच करायची आहे’, हा एकच विचार होता.

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : बरोबर आहे. तुमचा ‘आपल्‍याला साधनाच करायची आहे’, असा निश्‍चय झाला होता ना !

सौ. मनीषा पाठक : मी माहिती तंत्रज्ञान (I.T.) क्षेत्रात नोकरी करत होते. तेथे पैसे आणि मान होता. लोक माझ्‍या कामाचे कौतुक करायचे, तरीही माझे मन त्‍यात रमत नव्‍हते.

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : म्‍हणजे तुम्‍ही शरिराने कार्यालयात होता; पण तुमचे मन देवाकडे होते.

सौ. मनीषा पाठक : मला कार्यालयात न्‍यायला सकाळी ६.४५ वाजता बस यायची आणि संध्‍याकाळी ७.३० वाजता मला पुन्‍हा घरी आणून सोडायची; पण मी संध्‍याकाळी ७.३० वाजता घरी कधीच गेले नाही. तेव्‍हा महेश यांनी मला चांगली साथ दिली. ते ‘तू घरी येऊन स्‍वयंपाक कर’, असे मला कधीच म्‍हणाले नाही. मी जिज्ञासूंना संपर्क करण्‍याची सेवा करायचे आणि रात्री १०.३० वाजता घरी जायचे. मग केवळ वरण-भातच करायचे. माझी नोकरी कशीतरी चालू होती; पण मला त्‍यात आनंद मिळत नव्‍हता. ‘माझेे मन नोकरीमध्‍येे नसते’, हे मी काम करत असलेल्‍या आस्‍थापनातील लोकांच्‍याही लक्षात येऊ लागले. नंतर मी ठरवले, ‘आता आपल्‍याला सेवाच करायची आहे.’ महेशही म्‍हणाले, ‘‘तू नोकरी सोडू शकतेस.’’

८ आ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांचा आदर्श समोर ठेवून श्री. अन् सौ. पाठक यांनी पूर्णवेळ साधना करण्‍याचा निश्‍चय करणे 

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : आधी तुम्‍ही नोकरी सोडली. त्‍यानंतर महेशदादांनीही नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्‍याचा निर्णय घेतला. तेव्‍हा तुमच्‍या मनात ‘मुलगी लहान आहे. तिच्‍या शिक्षणाचे काय ?’, असा विचार आला नाही का ?

सौ. मनीषा पाठक : सद़्‍गुरु ताई, तुम्‍ही, संत आणि सद़्‍गुरु झाल्‍यानंतरच्‍या तुमच्‍या ध्‍वनी-चित्रचकत्‍या आम्‍ही बघायचो. आम्‍हाला घरात सूक्ष्मातून तुमचे अस्‍तित्‍व जाणवायचे. महेश यांना वाटले, ‘सद़्‍गुरु स्‍वातीताई पूर्णवेळ साधना करत आहेत आणि प.पू. गुरुदेवसुद्धा साधकांच्‍या समवेत आश्रमातच रहातात.’ एकदा गुरुदेव म्‍हणाले होते, ‘‘साधना हा ‘पार्टटाइम जॉब’ (थोडा वेळ करायचे काम) नाही.’’ त्‍यामुळे ‘आपल्‍याला पूर्णवेळ साधनाच करायची आहे’, असा आमचा निश्‍चय झाला.

८ इ. ‘देवाची नोकरी करतांना सुटी घ्‍यायची नसते’, असे वडिलांनी सांगणे : नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करायला आरंभ केल्‍यावर माझ्‍या वडिलांनी मला सांगितले, ‘‘आता तू मायेतली नोकरी सोडली आहेस आणि देवाची नोकरी धरली आहेस, तर आता येथे सुटी घ्‍यायची नाही.’’

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : फारच छान !’

(पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांच्‍या संत-सन्‍मान सोहळ्‍याच्‍या वेळी सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी त्‍यांच्‍या घेतलेल्‍या मुलाखतीतील संकलित भाग) (१४.३.२०२३) 

(‘ही मुलाखत सौ. मनीषा पाठक यांना संत म्‍हणून घोषित करण्‍यापूर्वीची असल्‍याने त्‍यांच्‍या नावाच्‍या आधी ‘पूज्‍य’ लावलेले नाही.’ – संकलक)

(क्रमशः)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.