सातत्याने अपघात होणार्‍या शिवशाही बसगाड्यांची पडताळणी !

केवळ जून २०१७ ते ऑक्टोबर २०१९ या साधारण अडीच वर्षांत तब्बल ५०० हून अधिक अपघात, ५० जणांचा बळी !

शिवशाही बसगाड्यांच्या अपघातांचे वाढते प्रमाण !

मुंबई – काही दिवसांपासून राज्यातील विविध विभागांतील ‘शिवशाही’ या एस्.टी. बसच्या अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सातत्याने होणारे अपघात आणि बिघाड लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एस्.टी.) महामंडळाच्या ताफ्यातील सर्व शिवशाही बसगाड्यांची विशेष अधिकार्‍यांकडून पडताळणी करण्यात येत आहे. पडताळणीचा अहवाल ४ जानेवारीपर्यंत सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या ७९२ शिवशाही बसगाड्या आहेत. महामंडळाने ८ वर्षांपूर्वी शिवशाही बस भाडेतत्त्वावर घेतल्या. वारंवार होणारे बिघाड आणि अपघात यांमुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. बसमधील वातानुकूलन यंत्रणा बंद असणे, आसनाची आच्छादने फाटलेली असणे आणि पडदे अस्वच्छ असणे यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. वातानुकूलित बसच्या नावाखाली अधिक पैसे घेऊनही चांगल्या सुविधा दिल्या जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. वाढते अपघात आणि तक्रारींच्या अनुषंगाने महामंडळाने प्रत्येक विभागातील या बसगाड्यांची विशेष पडताळणी करण्याचे आदेश सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.

शिवशाही बसगाड्यांच्या अपघातांचे चिंताजनक प्रमाण !

जून २०१७ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत शिवशाहीचे एकूण ५५० अपघात झाले. जून २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत ८३ अपघात झाले. या अपघातांत ७ जणांचा मृत्यू झाला, तर ६७ जण घायाळ झाले. पुढे एप्रिल २०१८ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत या बसगाड्यांचे ४४२ अपघात झाले आहेत. यांमध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला, तर ३०० जण घायाळ झाले.

संपादकीय भूमिका

गेल्या ८ वर्षांत शिवशाही बसगाड्यांचे शेकडो अपघात झाल्यानंतर जागे झालेले प्रशासन ! या अपघातांत प्रवाशांचा नाहक जीव जात असतांना त्याविषयी ठोस उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत ? याचे उत्तरदायित्व निश्‍चित करून संबंधितांवर काय कारवाई करणार, हे सरकारने जनतेला सांगितले पाहिजे !